मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर आरोप करुन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) अडचणीत आले आहेत. आता परमबीरसिंह आणि बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांची गुप्त भेट झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. यातच ते सरकारी वाहनाचा वापर करीत असल्याचेही समोर आले आहे. सरकारी गाडीचा वापर त्यांना आता महागात पडणार आहे.
मे महिन्यात वैद्यकीय सुटीवर गेलेले परमबीरसिंह हे अनेक महिने नॉट रिचेबल होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ते 25 नोव्हेंबरला मुंबईत दाखल झाले आहेत. ते चौकशीसाठी थेट गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले होते. त्यांची गुन्हे शाखेच्या कार्यालयात सलग सात तास चौकशी झाली होती. त्यानंतर आज ते ठाणे पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर झाले होते.
परमबीरसिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाच्या प्रमुखपदाची जबाबदारी आहे. अद्याप त्यांनी हा पदभार स्वीकारलेला नाही. काल चांदीवाल आयोगासमोर हजेरी लावली त्यावेळी त्यांनी गृहरक्षक दलाच्या कार्यालयाला भेट दिली होती. परंतु, त्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. असे असतानाही मुंबईत आल्यापासून ते सरकारी वाहनाचा वापर करीत आहेत. याबद्दल अनेक जण प्रश्न उपस्थित करीत होते.
याची दखल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली असून, हे अतिशय चुकीचे आहे, असे म्हटले आहे. ते म्हणाले की, परमबीरसिंग यांनी अजूनही पदभार स्वीकारला नाही. सरकारी गाडीचा वापर त्यांनी करणे चुकीचे आहे. ते सध्या कर्तव्यावर नाहीत आणि त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. तरीही ते सरकारी गाडी वापरत आहेत. सरकारी यंत्रणांचा वापर त्यांनी करणे चुकीचे आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
परमबीरसिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती (Chandiwal Committee) नेमली आहे. या समितीसमोर देशमुख यांच्या वकिलांनी परमबीरसिंह आणि वाझे यांच्या भेटीची माहिती दिली. त्यावर समितीने ही भेट आपल्यासमोर झाली नसल्याचे स्पष्ट करीत आक्षेप घेण्यास नकार दिला. मात्र, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी चौकशीसाठी पुढाकार घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.