Mumbai : राज्यात एकाच वर्षात दुसऱ्यांदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अजित पवारांसह नऊ आमदारांनी थेट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे एकीकडे शिंदे गटात अस्वस्थता पसरलेली असतानाच आता खातेवाटपावरुनही सरकारमध्ये तिढा निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना निधी मिळत नसल्याची तक्रार करुन शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. मात्र, आता अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले असून मंत्रिपदाची शपथ देखील घेतली आहे. त्यात राष्ट्रवादीतील सर्व मंत्री हे सीनिअर असल्यानं त्याचप्रमाणात खाती मिळावी अशी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची असल्याचं समोर येत आहे.
आता शिवसेना(Shivsena) आणि राष्ट्रवादीमध्ये मंत्रिपदासाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. तसेच शिंदे फडणवीस सरकारच्या संभाव्य यादीमध्ये अजित पवार यांना महसूल खातं असण्याची शक्यता आहे. पवारांना महसूल, दिलीप वळसे-पाटील यांना सांस्कृतिक, धनंजय मुंडे यांना सामाजिक तर छगन भुजबळ यांच्याकडे ओबीसी आणि हसन मुश्रीफ यांना कामगार खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा एकदा अजित पवारांकडे जात असल्याचं पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादीकडे 'ही' खाती देऊ नका...
याचवेळी शिंदे फडणवीस सरकारमधील संभाव्य खातेवाटपाची यादी समोर आल्यानंतर शिंदे गटामध्ये मोठी अस्वस्थता आहे. त्यांच्या नाराजीमागं अर्थाखातं हे पुन्हा एकदा अजित पवारांकडे जाणार असल्याचं कारण आहे. शिंदे गटातील नेतेमंडळींनी राष्ट्रवादीकडे अर्थ, जलसंपदा आणि बांधकाम ही खाती देऊ नका अशी मागणी आहे. अर्थ खातं त्यांना दिल्यास अजितदादा आमचं करिअर संपवतील असंही शिंदे गटातील आमदारांनी म्हटलं आहे.
मंत्रिपदासह पालकमंत्रीपदावरुनही अडचण...?
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता खाते वाटपावरुन तिढा निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण होत नसल्याची चर्चा आहे. भाजप आणि शिंदे गटाकडे असलेली खाती काही मंत्री सोडायला तयार नाहीत. तर राष्ट्रवादी(NCP)चे मंत्री सीनियर असल्याने त्याचप्रमाणात खाती मिळावी अशी भूमिका राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आहे. त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी पुन्हा एकदा तीनही पक्षात चर्चा होणार आहे. याचवेळी विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरुनही कोंडी निर्माण झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
अजित पवार मंत्रिपदाच्या तिढ्याबाबत काय म्हणाले..?
शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्रिपदाबाबत तिढा निर्माण झाला असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आत्ता नागपूरला जात आहेत. राष्ट्रपती येत आहेत त्यांना वेलकम करण्यासाठी हे दोघे जात आहेत. आम्ही आता एकत्र काम करायचं ठरवलं आहे. त्यामुळे कुठलीही नाराजी नाही. कुणालाही कसली अडचण नाही.
यासंदर्भात जेव्हा एका पक्षात विस्तार होतो किंवा पदांचं वाटप होतं तेव्हा मतमतांतरं असू शकतात. मात्र सगळ्यांचं म्हणणं ऐकल्यावर अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील. ते तो निर्णय योग्य पद्धतीने घेतील असा मला विश्वास आहे अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.