Avinash Jadhav MNS  sarkarnama
मुंबई

MNS Candidate Disqualified : निवडणूक अधिकाऱ्याची एकनाथ शिंदेंच्या उमेदवारासाठी सेटींग? मनसेचा उमेदवार अपात्र; अविनाश जाधवांचा नाव घेत हल्लाबोल

Avinash Jadhav MNS BJP Shivsena : आज मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली अर्ज बाद ठरवलेल्या उमेदवारांनी ठाणे महापालिका मुख्यालयात धडक देत वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारला.

सरकारनामा ब्यूरो

राहुल क्षीरसागर

Avinash Jadhav News : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचा सत्ताधाऱ्यांनी खेळखंडोबा करून ठेवला आहे. ठाण्यातील वागळे प्रभागात शिवसेना शिंदे गटाच्या राज्य सचिवाच्या पत्नीला बिनविरोध निवडून देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी षडयंत्र रचत मनसेसह विरोधकांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवले, असा गंभीर आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. जाधव यांच्या नेतृत्वात मनसेने ठाणे महापालिकेवर धडक देत वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारला.

ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेकडून २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या दाखल अर्जाची छाननी प्रक्रिया बुधवारी संबंधित निवडणुक कार्यालयामध्ये पार पडली. वागळे इस्टेट प्रभाग क्रमांक १६, १७ व १८ या प्रभागांमधील उमेदवारी अर्जाची छाननी निवडणुक निर्णय अधिकारी वृषाली पाटील यांच्या अधिपत्याखाली करण्यात आली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून सत्ताधारी पक्षातील उमेदवारांचे अर्ज गंभीर त्रुटी असून देखील बाद केले नाहीत. मनसेसह विरोधी पक्षातील आणि काही अपक्ष उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवले, असे जाधव म्हणाले.

वागळे प्रभाग क्रमांक १८ मध्ये शिवसेना शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांच्या पत्नी सुखदा संजय मोरे यांनी सेनेच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या मनसेच्या प्राची घाडगे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील यांनी रकान्यात 'निरंक' लिहिले नसल्याचा आक्षेप नोंदवुन बाद ठरवला. अशा प्रकारे सत्ताधाऱ्यापैकी कुणाचाही अर्ज बाद केलेला नाही. वास्तविक, अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांच्या अर्जातील रकाने रिकामे आहेत तसेच, अनेकांनी निर्धारीत वेळेनंतर आवश्यक कागदपत्रे जोडली असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

निवडणुक अधिकाऱ्यांच्या ह्या पक्षपातीपणाचा जाब विचारण्यासाठी गुरुवारी मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली अर्ज बाद ठरवलेल्या उमेदवारांनी ठाणे महापालिका मुख्यालयात धडक दिली. यावेळी निवडणुक यंत्रणेच्या पक्षपाती, अन्यायकारक वागणुकीचा त्यांनी पाढा वाचला. त्यावर, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे व उपायुक्त उमेश बिरारी यांनी के चौकशी करण्याचे तोंडदेखले आश्वासन देऊन निवडणुक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यवाहीत हस्तक्षेप करू शकत नसल्याची हतबलता व्यक्त केली. तसेच, या संदर्भात कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

निवडणूक यंत्रणा सत्ताधाऱ्यांची बटीक

वागळे इस्टेट प्रभाग क्रमांक १६, १७ व १८ या प्रभागांमधील उमेदवारी अर्जाच्या छाननी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील यांनी हे सर्व ठरवून केले आहे. छाननीपूर्वी अर्धातास आधी १०:३० वा सर्व उमेदवारांचे अर्ज नोटीस बोर्डवर प्रदर्शित करणे गरजेचे असताना दुपारी साडेतीन वाजता अर्ज बाहेर लावले. हा सर्व प्रकार तेथील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. निवडणूक आयोग स्वायत्त राहिलेला नसून निवडणुक यंत्रणा सत्ताधाऱ्यांची बटीक बनल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी माध्यमांशी बोलताना केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT