NCP Crisis : 'आमच्या शेंबड्या बाब्याला नेता करा, कार्यकर्त्यांनो तुम्ही फक्त पाणी भरा', संतप्त कार्यकर्त्याने अजितदादांना लिहलं पत्र
Jalgaon Politics : एकीकडे जळगाव महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी राजीनामा देत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप केले आहे.
जळगावचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून आपला राग व्यक्त केला आहे. या पत्राद्वारे त्यांनी आमदार गुलाबराव देवकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर जागांचा सौदा केल्याचा आरोप केला आहे. आमच्या शेंबड्या बाब्याला नेता करा आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांनो तुम्ही फक्त पाणी भरा, असे पाटील यांनी देवकर यांना उद्देशून म्हटले आहे.
अभिषेक पाटील यांनी म्हटलं आहे की, जळगाव शहर व जिल्ह्यात पक्षाचे नेतृत्व आपण ज्यांच्याकडे सोपवले आहे, त्यांनी महापालिका निवडणुकीतील जागावाटपातून पुन्हा एकदा स्वतःचा खरा चेहरा दाखवून दिला आहे. स्वार्थासाठी पक्षाची इभ्रत पणाला लावली आहे, मिळालेल्या जागांचा सौदा केला आणि त्यातून स्वतः मोकळे झाले, असा आरोप अभिषेक पाटील यांनी पत्राद्वारे देवकर यांच्यावर केला आहे.
अभिषेक पाटील यांनी अजित पवार यांना लिहलेल्या पत्राची सुरुवात करताना म्हटलं आहे की, आपण स्पष्टवक्ता, निर्णयक्षम आणि कणखर भूमिका घेणारे नेते म्हणून ओळखले जाता. सामान्य कार्यकर्त्याला आपले नेतृत्व धैर्य देणारे, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद देणारे वाटत आले आहे. त्यामुळेच आपल्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे, कदाचित आता होता असे म्हणावे लागेल, ही खंत मनात दाटून येते.
अभिषेक पाटील यांनी पुढे लिहलं आहे की,
आमच्या शेंबड्या बाब्याला नेता करा आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांनो तुम्ही पाणी भरा
या न्यायाने, माजी मंत्री व पक्षाच्या प्रमुख नेत्याने स्वतःच्या मुलासाठी एक जागा राखून ठेवली. ज्याला राजकारणात वा समाजकारणात काडीचीही रुची नाही. उरलेल्या जागांवर घड्याळाच्या चिन्हाखाली भाजपचे चेहरे निवडणूक लढवणार आहेत. ही वस्तुस्थिती आता लपून राहिलेली नाही. हे योग्य की अयोग्य, चांगले की वाईट याचा निकाल आपणच द्यावा अशी साद त्यांनी अजित पवार यांना घातली आहे.
या साऱ्या प्रक्रियेत पक्षाला काय मिळाले? हा प्रश्न जितका साधा आहे तितकाच महत्वाचा आहे. आणि कार्यकर्त्यांना काय मिळेल, हे तर सांगायलाच नको. वर्षानुवर्षे झेंडे उचलणारे, वेळ-श्रम-पैसा खर्च करणारे, कायम घरच्यांची नाराजी सहन करून बोलणी खाणारे प्रामाणिक कार्यकर्ते त्यांच्या वाट्याला सन्मानाऐवजी अपमान, आणि न्यायाऐवजी समजूतदारपणाच्या नावाखाली शांत बसण्याचा सल्ला मिळत आहे. या अश्या भंकस नेतृत्वाखाली जळगाव शहर व जिल्ह्यात पक्ष कसा सांभाळला जाईल आणि पुढे कसा नेला जाईल? या प्रश्नाचे उत्तर मला आपल्याकडून अपेक्षित आहे असं पाटील यांनी लिहलं आहे.
खर सांगायचं झाल तर आपण दिलेल्या जबदारीनुसार मी जळगाव शहराचा महानगराध्यक्ष आहे. जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचे एबी फॉर्म महानगराध्यक्ष या जबाबदारीने माझ्याकडे दिले पाहिजे होते व माझ्या सहीशिवाय ते ग्राह्य धरले जायला नको होते. हे पदाच्या अधिकाराचे उल्लंघन नाही का? आणि अपमान सुद्धा. पक्ष विचारांवर उभा असतो, कार्यकर्त्यांवर उभा असतो, डुप्लिकेट, स्वार्थी, लबाड लोकांवर नाही, सौद्यांवर नाही. महोदय, माझा हा निर्णय रागातून नाही; तो वेदनेतून आहे. तुमच्या नेतृत्वावर प्रेम होते, आहे आणि राहील. पण अन्यायावर डोळे झाकून उभे राहणे मला जमणार नाही. म्हणूनच, आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करणारा, प्रेम करणारा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाचा व प्राथमिक सभासदत्वाचा राजीनामा देत आहे.
हा राजीनामा विरोधाचा नाही, तर आत्मसन्मानाचा आहे. कदाचित हा आवाज किरकोळ वाटेल; पण तो अनेक न बोललेल्या कार्यकर्त्यांच्या मनातील अस्वस्थतेचा प्रतिध्वनी आहे, एवढी नम्र नोंद घ्यावी.
आपण योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा असं अभिषेक पाटील यांनी अजित पवार यांना लिहलेल्या पत्रात म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

