मुंबई : एनसीबीचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या पहिल्या विवाहाचे प्रमाणपत्र (Marriage Certificate) म्हणजेच निकाहनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी बुधवारी सार्वजनिक केला. तसेच लग्नावेळी ते मुस्लिम होते, असा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मलिक विरूध्द वानखेडे संघर्ष वाढला आहे. त्यावर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांनी पत्रकार परिषदेत मलिकांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
ज्ञानदेव वानखेडे यांनी समीर यांचा निकाहनामा खरा असल्याचेही कबूल केले आहे. मलिकांनी सार्वजनिक केलेल्या निकाहनाम्याविषयी बोलताना ते म्हणाले, निकाहनामा उर्दूमध्ये आहे. मला उर्दू वाचता येत नाही. इंग्रजीतील सही मात्र खरी आहे. हा निकाह झाला आहे. पण काही कारणांनी त्यांनी घटस्फोट घेतला. हे त्यांचं खासगी आयुष्य आहे. नवाब मलिकांनी कुणाच्याही खासगी आयुष्यात डोकावू नये. हे अत्यंत चुकीचे आहे. याविरोधात मी न्यायालयातही जाऊ शकतो.
निकाहनाम्यावर दाऊद नाव कसे?
माझी पत्नी मुस्लिम होती. त्यामुळे ती कधी प्रेमानं दाऊद बोलली असेल. इतरही काही जण बोलले असतील. घरात जसे आपण मुन्ना, अण्णा, मुनावर अशी नावं ठेवू शकतो. असं कुणीही बोलू शकते. तसं तिने निकाहनाम्यावर दाऊद लिहिलं असेल, असं स्पष्टीकरण ज्ञानदेव वानखेडे यांनी दिलं आहे.
समीर यांच्या काही कागदपत्रांवर समीर डी. वानखेडे असा उल्लेख कसा?
मी जेव्हा निवृत्त झालो त्यात डी. के. वानखेडे लिहिले आहे. माझ्या सर्व्हिस बुकमध्ये ज्ञानदेव कचरू वानखेडे हेच नाव आहे. काहीतरी चौकशी करूनच नोकरीला लागलो असेन. माझ्याकडील सर्व कागदपत्रांवर ज्ञानदेव कचरू वानखेडे हेच नाव आहे, असं ज्ञानदेव वानखेडे यांनी स्पष्ट केलं.
तुम्ही लग्नावेळी मुस्लिम असल्याचे सांगितले का?
आमचा प्रेमविवाह होता. मुस्लिमांमध्ये हिंदू-मुस्लिम असा निकाह होत नाही. माझ्या पत्नीने दाऊद असे नाव प्रेमाने लिहिले असेल. निकाहनाम्यात उर्दू असल्यानं मला ते वाचता येत नाही. पण माझं खरं नाव ज्ञानदेव हेच आहे, असा खुलासा ज्ञानदेव वानखेडे यांनी केला.
समीर आणि शबाना यांची आधीपासून ओळख
मी सरकारी क्वाटर्समध्ये राहत होतो. त्या दोघांचीही आधीपासूनच ओळख होती. शबानालाही आधीपासूनच आम्ही हिंदू असल्याचे माहिती होते, असं ज्ञानदेव वानखेडे म्हणाले. तसेच निकाहमधील 33 हजार मेहेरचा उल्लेखही खरा असावा. मला त्याबाबत माहिती नाही. कारण मुस्लिमांमधील ही प्रथा आहे. माझ्या पत्नीने हे सर्व केले असेल, असा दावा ज्ञानदेव यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.