Dombivli Kalyan News Sarkarnama
मुंबई

Ramdas Athawale : कल्याण-डोंबिवलीमध्ये आठवलेंचे कार्यकर्ते कुठे गेले? महायुतीतील नेत्यांना पडला प्रश्न

Maharashtra Politics : गेल्या वर्षभरात एकही कार्यक्रम नाही...

Mangesh Mahale

भाग्यश्री प्रधान आचार्य

Dombivli : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आता तयारीला लागले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निष्ठेची ठरणार आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी या मतदारसंघात दौरा केला. खासदार श्रीकांत शिंदेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर आणि मंत्री रवींद्र चव्हाण या मतदारसंघात जातीने लक्ष देत आहेत. असे असले तरी महायुतीचा मित्रपक्ष असणाऱ्या रिपाइं पक्षाचे नेमके काय सुरू आहे. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे महायुतीमध्ये असलेला रिपाइं पक्षाचे कार्यकर्ते नेमके आहेत कुठे, असा प्रश्न महायुतीतील नेत्यांनाही पडला आहे.

गेल्या दहा वर्षांत एकही नगरसेवक नाही...

गेल्या दहा वर्षांत रिपाइंचा एकही नगरसेवक महापालिकेतही निवडून आलेला नाही. त्याआधी आत्ताचे रिपाइंचे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी नगरसेवकपद भूषविले होते. मात्र, गेल्या दहा वर्षांत म्हणजेच जवळपास दोन टर्म त्यांचा एकही नगरसेवक निवडून गेला नाही. मात्र, असे असले तरी भाजप युतीमध्ये असल्याने आमची सर्व मतं भाजपच्या नगरसेवकांना मिळाली, असे पक्षातील कार्यकर्ते सांगतात.

कल्याण जिल्हाध्यक्षपदी प्रल्हाद जाधव, तर डोंबिवली शहराध्यक्ष अंकुश गायकवाड यांची वर्णी लागली आहे. सुरुवातीला काही दिवस डोंबिवली आणि कल्याणमध्येदेखील पक्षाकडून छोटे-छोटे कार्यक्रम राबविले जात होते. मात्र, गेल्या वर्षभरात डोंबिवली शहराध्यक्ष अंकुश गायकवाड यांची तब्येत बरी नसल्याने केंद्रीयमंत्री आठवले यांच्या हस्ते थाटामाटात उद्घाटन झालेले गायकवाड यांचे कार्यालयदेखील ओस पडले, तर कल्याण जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनीदेखील वैयक्तिक कामात लक्ष गुंतवल्याने पक्षाचे काम मागे पडले, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. सध्या जवळपास वर्षभरात एकही कार्यक्रम रिपाइंकडून राबवला गेलेला नाही. त्यामुळे रिपाइं पक्षाचे कार्यकर्ते सध्या आहेत तरी कुठे, असा प्रश्न विचारला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आठवले येतात आणि कार्यकर्त्यांना बळ देतात...

अधूनमधून रिपाइं पक्षाचे नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले येतात आणि पक्षाला बळ देतात. तीन ते चार महिन्यांपूर्वी आठवलेंनी कल्याण येथे भेट दिली होती. मात्र, आठवले यांची पाठ फिरल्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होताना दिसते. असे असले तरी महायुतीला साथ देणारा रिपाइं हा मित्रपक्ष सध्या निवडणुकीच्या तोंडावर कल्याण डोंबिवलीमध्ये किती सक्षम आणि सक्रिय आहे, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Edited by : Mangesh Mahale

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT