Shirdi News: ठाकरेंकडून एक 'नाना' दोन 'भाऊसाहेब'; काँग्रेसच्या तिघांची तयारी, लोखंडेंसह आठवलेंचा शिर्डी लोकसभेवर दावा

Shirdi Lok Sabha Constituency 2024: रामदास आठवलेदेखील उमेदवारीसाठी तयारीला लागले आहेत.
Shirdi Lok Sabha Constituency 2024 news
Shirdi Lok Sabha Constituency 2024 newsSarkarnama
Published on
Updated on

मोबीन खान

Shirdi:राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या लोकसभेच्या जागेचा तिढा अजून सुटलेला नसून जागावाटपाआधीच अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभेसाठी अनेक पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून नाना अर्थात माजी मंत्री बबनराव घोलप आणि दोन भाऊसाहेब अर्थात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि माजी आमदार भाऊसाहेब कांबळे इच्छुक असून, काँग्रेसकडून राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते, काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी राजेंद्र वाघमारे आणि कोपरगाव काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार पोटे हेदेखील मतदारसंघ पिंजून काढत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेदेखील शिर्डी लोकसभेच्या उमेदवारीसाठी तयारीला लागले आहेत.

पूर्वीचा कोपरगाव आणि आत्ताचा शिर्डी लोकसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत असतो,२००९ मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ झाल्यानंतर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यानंतर बाहेरील उमेदवारांचा शिर्डी मतदारसंघावर जास्त डोळा राहिलाय. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिर्डीचे सेनेचे खासदार सदाशिव लोखंडे एकनाथ शिंदेंसोबत गेल्याने सेनेच्या ठाकरे गटाकडून इच्छुकांची संख्या वाढली असून, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना काँग्रेस आणि आरपीआयदेखील मतदारसंघावर दावा करत आहे.

गेल्या तीन टर्म युती आणि आघाडी म्हणून लढत होत असल्याने शिर्डी मतदारसंघ युतीकडून शिवसेनेला आणि आघाडीकडून काँग्रेसला संधी आहे. मात्र, आता राजकीय समीकरण बदलले असून, महायुती आणि महाविकास आघाडी निर्माण झाल्याने शिर्डीच्या जागेचा तिढा सोडविण्याचे मोठे आव्हान सर्वच पक्षाच्या पक्षश्रेष्ठींसमोर उभे राहिले आहे.

पुन्हा २००९ची लढत? मात्र युती आघाडी बदलेली

२००९ मध्ये शिवसेना भाजप युतीकडून भाऊसाहेब वाकचौरे आणि काँग्रेस आरपीआय आघाडीकडून रामदास आठवले यांच्यात थेट लढत होऊन भाऊसाहेब वाकचौरे यांनी दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर २०१४ ला वाकचौरेंनी काँग्रेसचा हाथ धरला आणि शिवसेनेला आयत्यावेळी सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी द्यावी लागली.

मोदी लाटेत लोखंडे अवघ्या १७ दिवसांत खासदार झाले. त्यानंतर २०१९ मध्ये काँग्रेसकडून भाऊसाहेब कांबळे उभे होते. मात्र, त्यांना धोबीपछाड देत पुन्हा लोखंडे खासदार झाले. मात्र यंदा २०२४ मध्ये हा मतदारसंघ मविआकडून ठाकरे गटाकडे आणि महायुतीकडून आरपीआयला मिळाले आणि वाकचौरेंना उमेदवारी मिळाली तर २००९ ची लढत अर्थात भाऊसाहेब वाघचौरे विरुद्ध रामदास आठवले लढत शिर्डीत पुन्हा पाहायला मिळू शकते. मात्र, यंदा उमेदवारांच्या पक्षाची युती आघाडी बदलेली असेल.

महायुतीची ताकद वाढलेली मात्र ठाकरे, पवारांना सहानुभूती

२०१९ च्या विधानसभेत शिर्डी लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघात आघाडीचे वर्चस्व बघायला मिळाले. शिर्डी मतदारसंघ वगळता सर्वच ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी आणि नेवासा येथे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख निवडून आले आणि महाविकास आघाडीत गडाखांनी शिवसेनेकडून मंत्रीपद भूषवलं.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर कोपरगावचे आमदार आशुतोष काळे आणि अकोल्याचे किरण लहामटे अजित पवारांसोबत गेल्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीची ताकद सध्या वाढलेली दिसत आहे. संगमनेर येथे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात श्रीरामपूर येथे काँग्रेसचे लहू कानडे आणि नेवासा येथे शंकराव गडाख महाविकास आघाडीची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शिर्डी लोकसभेवर महायुतीची ताकद दिसत असली तरी मात्र पक्षफुटी मुळे तसेच शेतकरी प्रश्न, बेरोजगारी ,महागाई अशा अनेक मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनादेखील सहानुभूती असल्याने याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो.

या दिग्गज नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष

अकोले येथे भाजपचे मधुकर पिचड, तर अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे, संगमनेर येथे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, राहाता येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कोपरगाव येथे भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे, श्रीरामपूर येथे आमदार लहू कानडे, नेवासा येथे ठाकरे गटाचे आमदार शंकरराव गडाख आणि भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे दिग्गज नेते या लोकसभा निवडणुकीत काय भूमिका घेतात आणि कोणत्या उमेदवाराला मदत करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Edited by: Mangesh Mahale

Shirdi Lok Sabha Constituency 2024 news
Ajit Pawar News: यशवंतराव चव्हाण सेंटरवर आता अजितदादांचा डोळा?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com