Mumbai, 28 July : एकनाथ खडसेंविरुद्ध मला किती तिटकारा आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांनी मला छळ छळ छळलं आहे. पण जे योग्य आहे, ते योग्य आणि जे चुकीचे आहे, ते चुकीचे, असे सांगणारा माझा स्वभाव आहे. आताच्या घटकेला डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या अटकेच्या प्रकरणाला मला राजकीय वास येतो. कारण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात गेली चार ते पाच दिवस खडसे पत्रकार परिषदा घेत होते. त्यामुळे एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांना गप्प करण्यासाठी हे कटकारस्थान आहे की काय, अशी शंका येते, असा संशय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याप्रकरणी व्यक्त केला.
अंजली दमानिया (Anjali Damania) म्हणाल्या, ससून रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल मी अजून वाचलेला नाही. त्यात फक्त मद्यपान आहे की ड्रग्जपण आहे, हे मला माहिती नाही, त्यामुळे त्यावर मी बोलणार नाही. पण, त्यांनी ड्रग्जचं सेवन केले असेल तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे.
पोलिसांच्या नाकाखाली ह्या गोष्टी होत असतात, पण पोलिस कुठेही कारवाई करताना दिसत नाहीत. पण, अचानकपणे एका घरी जाऊन त्याला रेव्ह पार्टीचे Rave Party (शेकडो माणसं मोठ्या म्युझिकवर नाचत असतात, त्यात दारू आणि ड्रग्ज असेल तर त्याला ड्रग्ज पार्टी असे म्हणतात) नाव देऊन मीडियात सोडलं गेलं. त्यामुळे याला रेव्ह पार्टी म्हणता येईल का नाही, असा प्रश्न आहे.
पुण्यातील पार्टी प्रकरणी अनेक व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. मात्र, एकाच व्यक्तीचे नाव बाहेर दिलं गेलं. त्यामुळे डॉ. प्रांजल खेवलकर (Dr. Pranjal Khewalkar) यांच्या अटकेमागे राजकारणाचा वास येतो आहे. सध्या महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत किळसवाणं झालं आहे, असंही त्या म्हणाल्या.
योगेश कदम यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही देणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही दमानिया यांनी सुनावले. त्या म्हणाल्या, जे उपमुख्यमंत्री पूर्वी डान्सबारच्या विरोधात लढायचे, त्याच उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच पक्षाच्या योगेश कदमांची पाठराखण केली, हे दुर्दैवी आहे. त्यांनी स्वतः जाऊन तो सावली बार बंद करणे गरजेचे होते. त्या बारचे व्हिडिओही त्यांनी बघितले असतील. पण, ते अशा गोष्टींचे समर्थन करत आहेत, यातून स्पष्ट दिसते की त्यांना डान्सबार चालू ठेवायचा आहे.
जसं मी योगेश कदमांच्या डान्सबारच्या विरोधात बोलले. तसं नवी मुंबई, ठाणे या भागातील डान्सबारची माहिती माझ्याकडे आली. त्यात १५ डान्सबार ठाण्यात चालू असल्याचे पुढे आले आहे. एका डान्सबारमध्ये ३५ ते ५० बायका असतात.
कायद्यानुसार पाचपेक्षा जास्त बायका स्टेजवर डान्स करता कामा नये. स्टेजवरून खाली उतरता कामा नये. पण, ठाण्यात एका डान्सबारमध्ये ३५ ते ४० महिला नाचतात, याचे व्हिडिओ आहेत. त्याच्या चौकशीची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असेही दमानिया यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.