KDMC News
KDMC News Sarkarnama
मुंबई

केडीएमसीतील 65 बांधकाम विकासकांची माहिती ईडीने मागितली!

सरकारनामा ब्यूरो

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 65 बांधकाम व्यावसायिकांनी महारेरा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करत याचा तपास एसआयटी पथकाकडून केला जात आहे. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला पत्र पाठविले असून या प्रकरणातील सर्व कागदपत्रे पालिका प्रशासनाकडून ईडीने मागविली असल्याची माहिती खास सुत्रांनी दिली.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात झाली आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे बेकायदा बांधकाम प्रमाणपत्र बनवून ते रेराला सादर केले आहेत. याप्रकरणी रेराने 65 बांधकाम व्यावसायिकांना दिलेली नोंदणी रद्द केल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे.

याप्रकरणी 65 विकासकां विरोधात मानपाडा व रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास योग्य पद्धतीने व्हावा यासाठी ठाणे गुन्हे शाखा तसेच विशेष तपास पथकाकडून याची चौकशी केली जात आहे.

आता अंमलबजावणी संचालनालयाने देखील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला पत्रव्यवहार केला आहे. यामध्ये काही बांधकाम व्यावसायिकांनी महारेरा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी ईडीकडून मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, 2002 च्या तरतुदींनुसार तपास करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच या संदर्भात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने अशा बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरची माहिती ईडी कार्यालयाला द्यावी. महारेरा प्रमाणपत्रे जारी करताना आढळून आलेला गैरव्यवहार आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे अशा प्रमाणपत्रांचे लाभार्थी (विकासक) तसेच कागदपत्रे असलेल्या केस फाईलची प्रत सादर करण्यास ईडीने सांगितले आहे.

याविषयी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयी काहीही बोलण्यास नकार दिला. याविषयी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करत याप्रकरणात विकासकांसह महापालिका अधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यात यावे. याचा सखोल तपास करण्यात यावा अशी मागणी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT