Prajakt Tanpure Sarkarnama
मुंबई

ईडीनं राज्यमंत्री तनपुरेंवर का केली कारवाई? वाचा सविस्तर...

मनी लाँर्डिंग प्रकरणात काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर आता राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ईडीच्या रडारवर आले आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मनी लाँर्डिंग प्रकरणात काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक केल्यानंतर आता राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) ईडीच्या रडारवर आले आहेत. सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी तनपुरे यांची ४.६ एकर तर राम गणेश गडकरी साखर कारखान्याची ९० एकर जमीन जप्त केली. ईडीने जप्त केलेल्या जमिनीची किंमत जवळपास १३.४१ कोटी रुपये एवढी आहे.

या कारवाईमुळे राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील (MSCB) घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. हा साखर कारखाना अत्यंत कमी किंमती विक्री करण्यात आल्याचे हे प्रकरण आहे. तनपुरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे ते भाचे आहेत. त्यांच्याकडे ऊर्जाखात्यासोबत उच्च शिक्षण खात्याचे राज्यमंत्रीपद आहे.

या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 26 ऑगस्ट 2019 रोजी गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीच्या आधारे ईडीने (ED) करचुकवेगिरीची चौकशी सुरू केली होती. चौकशीनंतर ईडीने तनपुरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल झाला होता. तनपुरे यांचे वडील प्रसाद तनपुरे हे बँकेमध्ये संचालक होते. त्या काळातच कवडीमोल किंमतीत कारखान्याची विक्री झाली आहे.

यापकरणी ईडीने डिसेंबर महिन्यात राज्यमंत्री तनपुरे यांची चौकशी केली होती. कारखान्याचा लिलाव करताना बँकेकडून अनियमितता झाली. बँक व्यवस्थापनाने कारखान्याची किंमत कमी करून योग्य प्रक्रिया पार न पाडता ही विक्री प्रक्रिया राबवल्याचा आरोप ईडीने केला आहे. हा कारखाना प्राजक्त तनपुरे यांच्या प्रसाद शुगर अन्ड अग्रो प्रोडक्ट्स लिमिटेड या कंपनीला १२.९५ कोटी रुपयांना विकला होता. या लिलावामध्ये प्रसाद शुगर ही एकमेव कंपनी होती. पण लिलावात आणखी कंपन्यांचा सहभाग असल्याचे दाखवण्यात आले. प्रसाद तनपुरे हे २००४ ते २०१० या कालावधीत बँकेच्या संचालक मंडळाचे सदस्य होते.

प्रसाद कंपनीकडून कारखाना २००७ मध्ये खरेदी करून त्याचा व्यवहार २०१० मध्ये पूर्ण केला. हे लिलाव प्रक्रियेतील नियमांनुसार नव्हते, असेही ईडीच्या तपासात आढळून आले आहे. कारखाना खरेदी करतानाची बहुतेक रक्कम ही कारखान्याचे माजी अध्यक्ष रणजित देशमुख यांच्याकडून आल्याचेही तपासात समोर आले आहे. कारखाना ताब्यात घेतल्यानंतर सर्व मशिनरी वेगळ्या करून अहमदनगरमधील वांबोरी येथे पुन्हा उभारणी करण्यात आली. तर कारखान्याची जमीन तक्षशिला सिक्युरिटीजला २०११ मध्ये विकण्यात आली, असं ईडीनं स्पष्ट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT