Anil Deshmukh
Anil Deshmukh Sarkarnama
मुंबई

अनिल देशमुखांची ईडीकडून पुन्हा चार तास चौकशी; शेल्ड कंपन्यांबाबत विचारणा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज पुन्हा चार तास चौकशी करण्यात आली. ज्या शेल्ड कंपन्यांमार्फत पैशांचा गैरव्यवहार झाला आहे, त्याबाबत आज देशमुख यांच्याकडे विचारणा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. (ED interrogates Anil Deshmukh again for four hours)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर गेली काही महिन्यांपासून गायब असलेले देशमुख हे स्वतःहून एक नोव्हेंबर रोजी ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. त्याच मध्यरात्री त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. सध्या देशमुख हे ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्या कोठडीची मुदत सहा नोव्हेंबर आहे.

दरम्यान, अटक टाळण्यासाठी अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. पण, त्यांना दिलासा मिळू शकलेला नव्हता. त्यामुळे त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यांचे वय जास्त असल्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजीही घेतली जात आहे.

माजी गृहमंत्री देशमुख यांची आज (ता. ४ नोव्हेंबर) दुपारी वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सलग चार तास त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीत ज्या शेल्ड कंपन्यांमार्फत पैशांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आलेला आहे. त्याबाबत ईडीकडून अनिल देशमुख यांना प्रश्न विचारण्यात आल्याचे कळते. चौकशीदरम्यान देशमुख यांचे वकिल इंद्रपाल सिंह हेही उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणी सुप्रीम कोर्टात अद्याप सुनावनी सुरू असल्याची माहिती इंद्रपाल यांनी पत्रकारांना दिली.

दरम्यान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर आरोप करत सचिन वाझेला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असे सांगून खळबळ उडवून दिली होती. त्या परमबीर सिंग यांनी आता आपले म्हणणे अप्रत्यक्षरित्या मागे घेतले आहे. अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर करताना परमबीर सिंग यांनी आपल्याकडे या प्रकरणात सादर करण्यासाठी आणखी कोणतेही पुरावे नसल्याचे सांगितले आहे. आयोगासमोर झालेल्या सुनावणीत परमबीर सिंग यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केल्याची माहिती त्यांच्या वकिलाने बुधवारी दिलेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT