Eknath Shinde-Sharad Pawar  Sarkarnama
मुंबई

पवारांना भेटताच एकनाथ शिंदे हंगामी मुख्यमंत्री झाल्याच्या चर्चा!

शरद पवार (Sharad Pawar) यांची नैमित्तिक भेट असल्याची शिंदे (Eknath Shinde) यांची माहिती

सरकारनामा ब्यरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल होणे आणि त्यानंतर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणे, याचे पडसाद सोशल मिडियात उमटले. काहींनी शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार सोपविण्यात आल्याचे वृत्त दिले. त्यावरून शिंदे यांना तातडीने खुलासा करावा लागला.

``मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत असून त्यात कुठलेही तथ्य नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर उद्या एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यानंतर अवघे तीन ते चार दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होतील. आई जगदंबेचा कृपाशीर्वाद आणि तमाम जनतेच्या सदिच्छा उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहेत. त्यामुळे समाजमाध्यमावर फिरणाऱ्या खोट्या आणि खोडसाळ मेसेजस आणि पोस्टवर विश्वास ठेवू नये, ही नम्र विनंती, असे आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून करण्यात आले आहे.

पवार हे आज मुंबईतच होते. सायंकाळी शिंदे हे त्यांना भेटले. या भेटीचे छायाचित्र सोशल मिडियात व्हायरल झाले आणि शिंदेंकडे मोठी जबाबदारी आल्याचे सांगण्यात येऊ लागले. सोशल मिडियात तशा बातम्याही आल्या. मात्र त्यात तथ्य नसल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री हे आजारी किंवा परदेश दौऱ्यावर असल्यास आपले अधिकार विश्वासातील मंत्र्याकडे सोपवून जातात, हा रिवाज आहे. मंत्रीमंडळ बैठका या संबंधित मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली घेतल्या जातात. पण मुख्यमंत्री म्हणून अशा मंत्र्याला अधिकार नसतो. त्यामुळे शिंदे यांना या वृत्ताचे तात्काळ खंडन करावे लागले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT