Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde On Sharad Pawar : अजितदादांना पटलंय ते पवारसाहेबांनाही पटेल; एकनाथ शिंदेंचं सूचक वक्तव्य

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून उपमुख्यमंत्री अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर राज्याच्या विकासासाठी सत्तेत सहभागी झालो असल्याचे अजितदादा वारंवार सांगत आहेत. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मन वळवण्यासाठीही ते प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. यातच दोन्ही पवारांबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या वक्तव्याने राज्यात खळबळ उडण्याची शक्यता आहे. 'अजितदादांना पटलेय ते लवकरच शरद पवारांनाही पटेल', असे सूचक वक्तव्य करत शिंदेंनी राजकीय धुरळा उडवून दिला आहे. (Latest Political News)

राष्ट्रवादीमधील बंडानंतरही उपमुख्यमंत्री पवार आणि ज्येष्ठ नेते पवार यांच्यात भेटी होतात. ताकीद देऊनही फुटीर गटाकडून शरद पवारांचे फोटो वापरतात. यातच राष्ट्रवादीत फूट पडली नाही, अजित पवार आमचेच नेते असल्याचे वक्तव्य पवारांसह खासदार सुप्रिया सुळे करतात. यानंतर त्यांनी सारवासारव केली, मात्र राज्यात राष्ट्रवादीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. हाच धागा पकडून मुख्यमंत्री शिंदेंनी शरद पवारांबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

शिंदे म्हणाले, "मी सुद्धा ऐकले शरद पवार सकाळी एक म्हणाले आणि नंतर दुसरेच म्हणाले. पवारसाहेब मोठे नेते आहेत; परंतू ते जे बोलतात त्याच्या नेमका उलट अर्थ घायचा असतो. मोदी सरकारच्या कामगिरीवर विश्वास व्यक्त करत अजितदादांनी आमच्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे. चांद्रयानची मोहीम यशस्वी झाली आहे. महासत्तेकडे आपल्या देशाची वाटचाल सुरू आहे. त्याकडे एक पाऊल पडले आहे. जे अजितदादांना पटले ते हळूहळू पवारांनाही पटेल!"

राष्ट्रवादीत फूट पडली नाही, असे खासदार सुळेंनी केलेल्या विधानानंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातही नाराजी पसरली आहे. खासदार संजय राऊतांनी राष्ट्रवादीत फूटच पडली असल्याचे ठासून सांगितले. एक गट सत्तेत आणि दुसरा गट विरोधात, ही फूट नाही तर काय आहे, असे राऊत म्हणाले. आगामी इंडियाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या विधानांचे अनेक अर्थ काढले जात असले तरी त्यांनी आम्ही विरोधात असल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT