Shaktipeeth Road Sarkarnama
मुंबई

Shaktipeeth Road : लोकसभेनंतर विधानसभेची धास्ती! राज्य सरकारनं चार महिन्यांतच गुंडाळला मोठा प्रकल्प?

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : मुंबई ते नागपूर असा समृद्धी महामार्ग सुरू झाला असला तरी शिंदे सरकारवर दुसरा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अवघ्या चार महिन्यांतच गुंडाळण्याची नामुष्की ओढावली.

राज्यातील 11 जिल्ह्यांतून जाणारा शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला आता स्थगिती देण्यात आल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेला धक्का विधानसभेतही सोसावा लागू नये, म्हणून सरकारने हा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे.

गोवा ते नागपूर हा 802 किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतून जाणार होता. या महामार्गाला फेब्रुवारी 2024 मध्ये सरकारने ग्रीन सिग्नल दिला होता. मात्र यानंतर लोकसभा निवडणुकीत या जिल्ह्यांतून महायुतीच्या उमेदवारांना नाकारल्याचे स्पष्ट झाले. परिणामी महायुतीला लोकसभेत केवळ 17 जागांवर समाधान मानावे लागले. आता तो धोका टाळण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत.

राज्याच्या या प्रस्तावित मार्गासाठी एकूण 8 हजार 419 हेक्टर जमीन लागणार आहे. त्यापैकी सुमारे 8 हजार 100 हेक्टर ही शेतजमीन आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी या मार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध सुरू आहे. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून विरोधकांसह काही सत्ताधारी आमदारांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतल्याचेही दिसून आहे. त्यातून सरकारवर दबाब वाढल्याने विधानसभा निवडणूक होईपर्यंत या मार्गाला स्थगिती देण्यात आल्याची चर्चा आहे.

लोकांचा वाढता विरोध पाहता सरकारने प्रशासनाला तीन-चार महिने जमीन संपादित न करण्याचे आदेश दिले होते. तर विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात स्थापन होणारे नवे सरकार या प्रकल्पावर ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत या प्रकल्पाने बाधित होणाऱ्यांचा मोठा वचक राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, नांदेडचे भाजप नेते, खासदार अशोक चव्हाण Ashok Chavan यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांच्या भावना कळवल्या आहेत. मार्गावरील सर्व ठिकाणी सरकारविरोधी वातावरण असल्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री दादा भुसे यांनाही माहिती दिली आहे. त्यानुसार त्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत काम थांबवण्याचे मान्य केल्याचेही चव्हाणांनी स्पष्ट केले. आता या शक्तीपीठ महामार्गाच्या कामास स्थगिती दिली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT