Eknath Shinde, Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics: राजकारणातली मोठी घडामोड; राजकीय दुरावा संपला, एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला, मनसे-शिवसेना युती..?

Eknath Shinde Meet Raj Thackeray : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. माहीममधला अमित ठाकरेंचा पराभव राज यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता.

Deepak Kulkarni

Mumbai News: महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी राजकीय घडामोड मंगळवारी (ता.15) रात्री घडली. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातले दोन दिग्गज नेते एकमेकांना भेटले आहेत. निवडणुकीदरम्यान आलेला दुरावा संपवत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे स्नेहभोजनासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. या भेटीमुळे मुंबई महापालिकेसाठी शिवसेना - मनसे युतीची चर्चांना उधाण आलं आहे.

विधानसभा निवडणुकीदरम्यान मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. त्यानंतर राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेर तिखट शब्दांत टीकेचे आसूड ओढले होते. आता तोच राजकीय दुरावा संपवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थ गाठत थेट मनसेप्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली असल्याची चर्चा आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. माहीममधला अमित ठाकरेंचा पराभव राज यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्याचमुळे त्यांनी अनेकदा भाजपवर स्तुतीसुमनं उधळताना शिंदेंच्या शिवसेनेला कानपिचक्या दिल्या होत्या.

विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरेविरोधात उभे राहिलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या सदा सरवणकरांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय दुरावा निर्माण झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं. तसेच मुंबई महापालिकेसाठी एकनाथ शिंदे राज ठाकरेंशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहेत.

महायुतीतील भाजप,एकनाथ शिंदेंनी एकीकडे मुंबई महापालिकेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीतील अपयशातून बाहेर पडत मुंबई महापालिकेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. तसेच त्यांच्याकडून स्वबळाचा नाराही देण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंची भेट घेतली होती.त्यावेळीही दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा सुरू होती. त्यानंतर राज ठाकरे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपशी मिळतीजुळती भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचदरम्यान,आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यासोबत नवी राजकीय समीकरणं निर्माण होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT