Ganesh Naik vs Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

BJP Vs ShivSena : गणेश नाईकांच्या वर्चस्वाला 'ठाण्यातून' हादरे; नवी मुंबईत शिंदे 'भाजपला' डोईजड ठरणार!

BJP Vs ShivSena : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नवी मुंबईतील 12 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Hrishikesh Nalagune

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नवी मुंबईतील 12 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील या माजी नगरसेवकांनी आता शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. या प्रवेशानंतर नवी मुंबई महापालिकेतील शिवसेनेकडील माजी नगरसेवकांच्या संख्येत भाजपपेक्षा वाढ झाली आहे. ही वाढलेली संख्या वनमंत्री गणेश नाईक यांच्या एकहाती वर्चस्वाला हादरे देणारी ठरली आहे.

नवी मुंबई भागात मागील अनेक वर्षांपासून वनमंत्री गणेश नाईक यांचे एकहाती वर्चस्व आहे. ते राष्ट्रवादीत असो की भाजपमध्ये इथले सत्ताकेंद्र कायमच नाईक यांच्याभोवती राहिले. त्यांचे सुपुत्र संजीव नाईक हे ठाण्याचे खासदार होते. धाकटे पुत्र संदीप नाईक ऐरोलीचे आमदार होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बेलापूर मतदारसंघातून अवघ्या 377 मतांनी संदीप यांचा पराभव झाला. गणेश नाईक यांचे पुतणे सागर नाईक हेही नवी मुंबईचे महापौर होते. 2019 मध्ये नाईक यांच्यासोबत इथल्या राष्ट्रवादीच्या 48 नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता.

याच गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वैर सर्वश्रृत आहे. अशात शिंदे यांनी मागील काही दिवसांपासून नवी मुंबईमध्ये लक्ष वाढवले आहे. खासदार नरेश म्हस्के यांचा इथे दरबार भरतो. ते महापालिकेतील अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठका घेत निर्देश देत असतात. आता 12 नगरसेवकांचा प्रवेश करवून घेत शिंदे यांनी गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला तगडे आव्हान दिले आहे. भाजपकडे 48 माजी नगरसेवकांची ताकद मागे टाकत शिंदे यांच्याकडे 50 हून अधिक माजी नगरसेवक झाले आहेत.

अशी वाढत गेली शिंदेंची ताकद :

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर नवी मुंबईतही शिवसेनेचे दोन गट पडले. त्यावेळी जवळपास 18 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान आणखी काही माजी पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलं. त्यावेळी शिवसेनेकडे 37 माजी नगरसेवक झाले होते. आता पुन्हा महाविकास आघाडीतील 12 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने माजी 50 हून अधिक माजी नगरसेवक झाले आहेत.

शिंदे भाजपला डोईजड ठरणार?

नवी मुंबई पालिकेत 111 नगरसेवकांची सदस्य संख्या आहे. पालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेता चार जणांचे एक पॅनेल तयार होणार आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाने तशी रचनादेखील तयार केली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने त्या दिशेने आतापासून कामाला सुरुवात केल्याचे दिसून येते. आता जे प्रवेश होत आहेत तेथे सर्व पॅनेलनिहाय माजी नगरसेवकांची फौज भरली जात आहे. या दिशेने वाटचाल सुरू ठेवल्यास पालिका निवडणुकीतही शिंदे गट भाजपला डोईजड ठरेल, अशी शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT