Eknath Shinde.jpg Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde News : ...अन् क्षणातच डॅशिंग, कणखर मुख्यमंत्री शिंदेंच्या डोळ्यात अश्रू तरळले!

Deepak Kulkarni

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास हा थक्क करणारा असाच आहे. आधी संवेदनशील नेता ही ओळख त्यांची होती.पण शिवसेनेतील बंडानंतर आणि मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांची डॅशिंग आणि कणखर नेतृत्व असणारा नेता म्हणूनही ओळख निर्माण झाली आहे. ते त्यांच्या भाषणात नेहमीच कुटुंबाबद्दल बोलताना भावूक होतात.पण आज एका कार्यक्रमात एकनाथ शिंदेंच्या डोळ्यात अश्रू तरळले.ते क्षणभर गहिवरले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या जीवनावर आधारित डॉ.प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा ठाण्यात करण्यात आले. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. एक रिक्षावाला ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा प्रवास या पुस्तकात शब्दबध्द करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडल्यानंतर एक चित्रफीत दाखवण्यात आली.ही चित्रफीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या आईची होती. त्यात मी आज जरी या कार्यक्रमस्थळी शरीराने नसले तरी तू स्वत:ला एकटं समजू नकोस. तुझ्या प्रेमापोटी किती मोठ-मोठी मंडळी आज इथं आलीय. आज मला आठवण येतेय, ती आनंद दिघेसाहेबांची. तुझ्या डोळ्यातील अश्रू मला दिसताय, मी इथेच आहे,असं या चित्रफितीतील आवाज येतो अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे डोळे क्षणात पाणावतात. ही चित्रफित दाखवल्यानंतर वातावरण एकदम शांत झाले.आणि कॅमेरे खुर्चीवर बसलेले एकनाथ शिंदेंवर खिळले. पण त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.

मुख्यमंत्री शिंदेंच्या जीवनावरील पुस्तक प्रकाशन सोहळ्याला राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार,पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांसारखी दिग्गज मंडळी उपस्थित होती.तसेच एकनाथ शिंदे यांचे वडील,मुलगा,सून आणि नातूही अशा चार पिढ्या या कार्यक्रमात उपस्थित होते. दिवंगत बाळासाहेब ठाकरे,दिवंगत आनंद दिघे आणि त्यांच्या मातोश्री स्व.गंगूबाई शिंदे यांच्या प्रतिमा व्यासपीठावर होत्या.

तसेच आलेल्या सर्व मान्यवरांना वारकरी संप्रदायाची वेशभूषा करण्यात आली होती. यावेळी,पुस्तक प्रकाशनानंतर व्यासपीठावर त्यांच्या मातोश्रींची एक चित्रफित दाखवण्यात आली.ही चित्रफित पाहिल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचं दिसून आलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संघर्षावर आधारित ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमात अजित पवारांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत तुफान फटकेबाजी केली. ते म्हणाले, मी आजवर अनेक मुख्यमंत्री पाहिले मात्र, लोकांच्या गराड्यात अडकलेला हा पहिला मुख्यमंत्री पाहिला. तसेच लोकांच्या अर्जावर सर्वाधिक सह्या करणारा हा मुख्यमंत्री आहे, अशा शब्दांत त्यांनी शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव केला.

अजित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांची टर्म 1999 साली सुरु झाली.तर एकनाथ शिंदेंची कारकीर्द 2004 पासून सुरू झाली. मी यांच्या आधीचा आहे, पण हे दोघेही पुढे गेले आणि मी तिथेच राहिलो. मी देवेंद्र फडणवीस यांना म्हटलं की, मला जर मुख्यमंत्री करणार असं बोलला असता तर संपूर्ण पक्षच घेवून आलो असतो अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT