Chandrakant Patil Ink Attack : महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान करणारे भाजपचे नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा विविध संघटनांनी निषेध केला आहे. चंद्रकांत पाटलांवर पिंपरी-चिंचवड येथील कार्यक्रमात शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणी ११ पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली होती. या निलंबित पोलिसांबाबत शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. (Chandrakant Patil Ink Attack latest news)
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यांवर कलम 307 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या ठिकाणी बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या ११ पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं.
यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, संघटनांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता या पोलिसांना पुन्हा सेवेत रूजू करून घेण्यात आलं आहे. यात तीन पोलिस अधिकारी व आठ पोलिसांचा समावेश आहे. या प्रकरणात ३०७ हे कलम काढून टाकले आहे.
महापुरुषांसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्याबद्दल पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माफी मागितली आहे. तसेच, वाद थांबविण्याचे आवाहन केले आहे. पालकमंत्री पाटील यांच्या वक्तव्यावरून राज्यभर आंदोलने आणि निषेध मोर्चा निघत आहेत. मी आधी स्पष्टीकरण दिले होते. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहीर माफी मागतो, असे निवेदन पालकमंत्री पाटील यांनी प्रसारमाध्यमांना पाठवले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करत आलो आहे. त्यांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे. पण त्यानंतर घडलेल्या घटना क्लेशदायक आहेत. या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये, असे मला वाटते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.