Mumbai News: विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. यातच महायुतीच्या तीनही पक्षांच्या नेत्यांकडून कायमच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून वेगवेगळे दावे केले जात असतात. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरुन तर्क-वितर्क केले जात आहेत. त्यात शिवसेनेतील दाव्यांमुळे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यासह विधान परिषदेचे माजी आमदार अमोल मिटकरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींकडून मुख्यमंत्री पदासाठी उपमुख्यमंंत्री व पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे आणलं होतं. यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदावरुन आधी आमदार बच्चू कडू आणि आता थेट शिवसेना मंत्र्यानीच शिंदेंच्या सीएमपदाबाबत जाहीर विधान करत खळबळ उडवून दिली आहे.
शिवसेनेचे विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार बच्चू कडू यांच्या दाव्यानंतर आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, अशी जाहीर इच्छा व्यक्त केली आहे. सामंत यांच्या या नव्या इच्छेमुळे महायुतीत नव्या वादाची ठिणगी पडल्याचं राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू असल्याचं समोर आलं आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एकीकडे विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावरच पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या सीएम पदाबाबतचा दावा केला आहे. ते म्हणाले, बच्चू कडू यांच्याशी बोललो आहे. त्यांची शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाबाबतची मागणी वैयक्तिक आहे. मात्र,ही मागणी स्वाभाविक असल्याचं त्यांनी सांगितलं.
उदय सामंत म्हणाले, माझीही मागणी आहे की, एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावे. जशी भाजपची मागणी असते देवेंद्र फडणवीस व्हावे, तशीच आमची मागणी असते. याचदरम्यान, त्यांनी बच्चूभाऊंना ज्या सूचना करायच्या होत्या, विनंती करायची होत्या त्या केल्याचंही सामंत यांनी म्हटलं.
बच्चू कडू म्हणाले, जसं भाजपवाल्यांना फडणवीस मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं, तसंच आम्हा शिवसैनिकांनाही शिंदेंसाहेब मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं. आम्ही शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावं असं म्हणणार ना,का आम्ही एमआयएमचा मुख्यमंत्री व्हावा असं म्हणायचं? असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी सध्या राज्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत ना, मग एकनाथ शिंदे कसे मुख्यमंत्री होणार असा सवालही बच्चू कडू यांनी उपस्थित केला. त्यावर फडणवीसांचं प्रमोशन व्हावं अशी मिश्किल टिप्पणीही विधानपरिषदेचे आमदार बच्चू कडू यांनी केली होती.
विधान परिषदेचे आमदार बच्चू कडू, उद्योगमंत्री उदय सामंत तसेच विद्यमान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही माध्यमांशी बोलताना महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांसह जनतेचीही इच्छा आहे की, एकनाथ शिंदे यांनीच पुन्हा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवावं असं त्यांनी सांगितलं.
यानंतर भंडारा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनीही शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक विधान केलं आहे. ते म्हणाले, आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा,हे प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वप्न असतं आणि तो आमचा अधिकार आहे. एकनाथ शिंदेसाहेबांना पुन्हा मुख्यमंत्री बनवणं,हेच आमचं एकच स्वप्नं आणि संकल्पही असल्याची भूमिकाही भोंडेकर यांनी मांडली.
आम्ही आधी एकटे भांडत होतो,अनेक नेते मॅनेज झाले होते. पण आता दोन नाही तर,आम्ही 11 झाल्याचंही त्यांनी म्हटलं. त्यांनी विरोधकांवर आणि अंतर्गत राजकीय समीकरणांवर निशाणा साधला. पूर्व आणि पश्चिम विदर्भातील 62 विधानसभा जागांपैकी किमान 30 जागा जिंकून आणणार असल्याचा निर्धार बोलून दाखवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.