Mumbai News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे शहर आणि जिल्हा नेहमीच बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आनंद दिघेंनंतर शिवसेनेचं एकहाती वर्चस्व राखत एकनाथ शिंदेंनी ठाण्यावर आजतागायत पूर्ण 'होल्ड' ठेवला आहे. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून ते सलग 4 वेळा (2004-2019) आमदार तसेच मंत्रीही राहिले आहेत. याच उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थानापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाण्यातील नितीन सिग्नल जवळील ग्रीन रोड परिसरात तणावासह दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या परिसरात एका माथेफिरूनं रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या 10 ते 12 गाड्यांची तोडफोड केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनं परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेसह भीतीचं वातावरण पसरलं आहे.
ठाण्यातील नितीन सिग्नल नजीकचा ग्रीन रोड परिसरापासून उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान अतिशय जवळ येत असल्यानं या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त कायमच तैनात असतो. पण याच भागात एका माथेफिरूने घातलेल्या धुमाकुळामुळे येथील नागरिक प्रचंड दहशतीखाली असल्याची माहिती समोर येत आहे.
एकाचवेळी या आरोपीनं अचानक वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. महत्त्वाची बाब म्हणजे संबंधित आरोपीनं चारचाकींसह रुग्णवाहिका, वाहतूक करणाऱ्या टेम्पोंचीही तोडफोड केली. या वाहनांच्या तोडफोडीनंतर काचाच काचा सगळीकडे झाल्याचं दिसून आलं होतं. या तोडफोडीच्या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा सवाल उपस्थित केले जात आहे.
ठाण्यातील नितीन सिग्नल नजीकचा ग्रीन रोड परिसरातील या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. या तोडफोडीत वाहनांचं मोठं नुकसान झालं असून भीतीग्रस्त नागरिकांकडून परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे.
काही दिवसांपूर्वीच पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ओएसडी असल्याचे सांगत एक गृहस्थ तावातवात आले आणि थेट पोलीस उपायुक्तांच्या समोर खुर्चीवर बसून 'तुम्हाला गुन्ह्यामध्ये नीट तपास करता येत नाही', अशी चढ्या आवाजात विचारणा करू लागल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.
मात्र, पुढील व्यक्तीचा अविर्भाव आणि सुरू असलेल्या त्याच्या हालचाली पोलिसांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. यानंतर पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी तातडीने याची खातरजमा करत आरोपी प्रद्युम पाटील हा खरंच उपमुख्यमंत्री शिंदेंचे ओएसडी आहेत का? याची माहिती घेतली असता तो तोतयागिरी करताना आढळून आला होता. यानंतर पोलिसांनी या तरुणाला तातडीनं ताब्यात घेतलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.