मुंबई : सर्वोच्च न्यायालयाकडून आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला ११ जुलैपर्यंत स्थगिती मिळाल्यानंतर राजकीय बैठकांना वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काल भाजपची बैठक झाली, तर आज दुपारी बंडखोर आमदार शिंदे गटाची बैठक होणार आहे. त्यानुसार बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उद्या (ता. २९ जून) मुंबईत (Mumbai) येणार आहेत. तसेच ते राज्यपालांना भेटून महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्र देणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. (Eknath Shinde to arrive in Mumbai tomorrow )
बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गटाची गुवाहाटीमध्ये आज दुपारी एकनंतर बैठक होणार आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा ऊहापोह करण्यात येणार आहे. तसेच, या बैठकीत सत्तास्थापनेबाबत चर्चा होणार आहे. महत्वाचे म्हणजे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे उद्या (ता. २९ जून) मुंबईत येण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे. मुंबईला येऊन एकनाथ शिंदे हे राजभवानात जाऊन राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्या ठिकाणी ते राज्यपालांना महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे पत्र देणार आहेत, त्यामुळे ठाकरे सरकारला लवकरच बहुमत चाचणी करावी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Eknath Shinde Latest Marathi News)
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची काल बैठक झाली. त्यामध्ये सत्तास्थापनेबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्या बैठकीला जात असताना माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली ‘व्हीक्टरी’ची खूण विशेष मानली जात आहे. एवढे दिवस पडद्याआडून सूत्रे हलविणारी भाजप काल प्रथमच एकनाथ शिंदे यांच्या बंडावर भाष्य करताना दिसली. भाजप आणि एकनाथ शिंदे गटामध्ये सत्तावाटपाची चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, मंत्रीपदावरून त्यांच्यामध्ये एकमत होत नसल्याचे दिसून येत आहे.(Maharashtra Political Crisis)
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात काय म्हटले आहे?
एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची पुढील सुनावणी आता 11 जुलै रोजी होणार आहे. त्यानंतरच याबाबतच्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत. केंद्र सरकार, शिवसेनेेचे गटनेते अजय चौधरी यांनाही न्यायालयाने नोटीस बजावली आहे. उपाध्यक्षांना १६ आमदारांना अपात्र करण्यासाठी पाठविलेली नोटीशीची मुदत ही आज संपणार होती. या आमदारांनी ही मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर ११ जुलैपर्यंत बंडखोर आमदारांवर कारवाई करणार नाही, अशी ग्वाही उपाध्यक्षांचे वकिल आर. धवन यांनी दिली. मात्र त्याला शिवसेनेचे वकिल यांनी अभिषेक मनु संघवी आणि शिवसेनेचे वकिल देवदत्त कामत यांनी अशा प्रकारे उपाध्यक्षांची ग्वाही रेकाॅर्डवर घेणे, हे कायदेशीर नसल्याचे सांगितले. हा उपाध्यक्षांच्या कामकाजातील हस्तक्षेप ठरेल, असा मुद्दा या दोन वकिलांनी दिला. मात्र धवन यांनी दिलेली ग्वाही मान्य करत न्यायमूर्तींनी १२ जुलै रोजी संध्याकाळी साडेपाचपर्यंत आपले म्हणणे मांडण्याची मुदत वाढवून दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.