Mumbai Political News : सत्तासंघर्षातून ठाकरे-शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांचा रंगलेला सामना आता थेट पोलिस स्टेशनच्या दारात गेला आहे. बंडखोरीपासून दिवसागणिक शिंदेंवर शाब्दिक हल्ले करून छेडणाऱ्या युवासेनेचे प्रमुख, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना सत्ताधारी शिवसेनेने पोलिसांच्या पिंजऱ्यात उभे करून इंगा दाखवण्याची चाल खेळल्याचे बोलले जात आहे.
लोअर परेल येथील पुलाच्या दुसऱ्या लेनच्या उद्घाटनप्रकरणी आदित्य यांच्याविरोधात आता गुन्हा दाखल झाला आहे. परिणामी ठाण्यातील शाखेवरून झालेला गोंधळ, शिवसेनाप्रमुख स्मृतिदिनानिमित शिवतीर्थावरील वादाने तापलेल्या वातावरणानंतर आता आदित्य यांच्यावरील गुन्ह्याने शिंदे-ठाकरे गटात भडका उडण्याची चिन्हे आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला शिवतीर्थावर ठाकरे आणि शिंदे गट भिडले होते. शिवतीर्थावर हा राडा सुरू असताना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी लोअर परेल उड्डाण पुलाच्या दुसऱ्या लेनचे परस्पर उद्घाटन केले. मंत्र्यांच्या वेळेनुसार ही लेन खुली करेपर्यंत सामान्य लोकांना त्रास होत आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचे उद्घाटन केल्याचे त्यांनी सांगितले होते. या प्रकरणी आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Political News)
लोअर ब्रिजच्या दुसऱ्या लेनच्या उद्घाटनानंतर आता आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता होती. या प्रकरणी पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांनी ना. म. जोशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार शुक्रवारी रात्री उशिरा आदित्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणणे आणि जमाव जमवणे या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीत नमूद केले की, या डिलाई रोडवर इतर कामे अपूर्ण आहेत. ती पूर्ण करण्यासाठी साधारणपणे सात दिवसांचा कालावधी लागणार होता. त्यानंतर या ब्रिजचे काम पूर्ण करून मुंबई महापालिकेने ही लेन सुरू करण्याचे नियोजन केले होते. असे असतानाही आदित्य ठाकरेंनी उद्घाटन केले. हा प्रकार बेकायदेशीर असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, परेल पुलाच्या दुसऱ्या लेनचे उदघाटन केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी पालिकेच्या कारभारावर टीका केली होती. ते म्हणाले होते, आधी पुलाचे काम रखडवले होते. आमच्या मागणीनंतर काम पूर्ण झाले. यास आता अनेक दिवस झाले आहेत. आता कुणासाठी या पुलाचे उद्घाटन थांबवले आहे. पालकमंत्र्यांना वेळ नाही म्हणून लोकांची कोंडी करणार का? त्यामुळे लोकांसाठी उद्घाटन केले.'
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.