Eknath Shinde News
Eknath Shinde News  Sarkarnama
मुंबई

Politics : मी मुख्यमंत्री आहे, सगळ्यांची खबर ठेवतो; केजरीवाल-ठाकरेंच्या भेटीवरुन शिंदेंचा टोला

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शुक्रवारी (दि.24 फेब्रुवारी) उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. ''उद्धव ठाकरे हे वाघाचा मुलगा आहेत, ते ही लढाई जिंकतील'', असं ते म्हणाले.

आता ठाकरे आणि केजरीवाल यांच्या या भेटीवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला आहे. ''मी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टींची खबर ठेवतो. आम्ही त्यांना (उद्धव ठाकरे यांना) जवळून पाहिलं आहे. त्यामुळे त्यांना आम्ही ओळखतो'', असं म्हणत ठाकरेंना टोला लगावला. ते आज एका वृत्तवाहीनीच्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

तसेच शिवसेना आणि पक्षचिन्ह मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, ''आम्हला निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह दिलं. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं. त्यांच्या संपत्तीवर आम्ही दावा केलेला नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालत आहोत'', असं शिंदे म्हणाले.

2024 मध्येही तुम्हीच मुख्यमंत्री असणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना शिंदे म्हणाले, ''आता कुणाला मुख्यमंत्री करायचं हे जनतेच्या हातात असतं. आम्ही काम करत आहोत. या पुढेही आम्ही काम करत राहू''.

''कुणाला मुख्यमंत्री करायचं आणि कुणाला मुख्यमंत्री पदावरून हटवायचं. हे सर्व जनताच ठरवत असते. आम्ही दिवस-रात्र एक करून काम करत आहोत. राज्यात मोठं-मोठे प्रकल्प उभारण्याचे काम आम्ही करत आहोत'', असं ते म्हणाले.

''माझा स्वभाव हा काम करण्याचा आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. न्याय व्यवस्था, निवडणूक आयोग या स्वायत्त संस्था आहे. आपल्या बाजूने निर्णय लागला की या संस्था चांगल्या आणि आपल्या विरोधात निर्णय लागला की संस्था वाईट, असं काहीजण म्हणत आहेत. मात्र, विरोधकांनी केलेल्या आरोपांना मी माझ्या कामातून उत्तर देईल'', असं शिंदे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT