Hitendra Thakur Sarkarnama
मुंबई

Hitendra Thakur: हितेंद्र ठाकूर यांना कोर्टाचा मोठा दिलासा; पालघरमध्ये पुन्हा 'शिट्टी' वाजणार

Bahujan Vikas Aghadi Hitendra Thakur: बहुजन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विधानसभेची निवडणूक शिट्टी चिन्हांवर लढवता येणार आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष असलेल्या हितेंद्र ठाकूर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Palghar News: पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार असून पक्षाचे चिन्ह 'शिटी' हे सर्वाना परिचित आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शिटी हे चिन्ह जनता दल ( युनायटेड ) या पक्षासाठी राखीव ठेवल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर बहुजन विकास आघाडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत सुट्टीच्या न्यायाधीशांसमोर जनहित (रिट) याचिका दाखल केली होती.

याचिकेवर आज ४ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाने बहुजन विकास आघाडीच्या बाजूने निकाल दिला आहे. बहुजन विकास आघाडीला 'शिटी' चिन्ह वापरता येईल, असे आपल्या निकालपत्रात म्हटले आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विधानसभेची निवडणूक शिट्टी चिन्हांवर लढवता येणार आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष असलेल्या हितेंद्र ठाकूर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

२०१८ च्या लोकसभा पोटनिवडणुकीपासून बविआला शिट्टी हे चिन्ह मिळू नये म्हणून विरोधी पक्षांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. २०१९ ची विधानसभा निवडणूक मात्र बविआने शिट्टी या चिन्हावर लढवली होती. त्यामुळे या निवडणुकीतही बविआला शिट्टी चिन्ह मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र निवडणूक आयोगाने शिट्टी चिन्ह जनता दल (युनायटेड ) या पक्षासाठी राखीव ठेवल्याने वाद निर्माण झाला होता.

या निकालामुळे विरोधी पक्षांनी सातत्याने केलेले प्रयत्न अपयशी ठरले असून अखेर मुंबई उच्च न्यायालयाने बविआला हे चिन्ह दिल्याने बविआला दिलासा मिळाला आहे. यामुळे वसईत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

बहुजन विकास आघाडीने याचिकेत निवडणूक आयोगाने ३० जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेले पत्र व त्यामुळे झालेल्या परिणामांबाबत हरकत घेतली होती. बहुजन विकास आघाडीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरच आज हा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर आणि न्यामूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT