Manoj Jarange: लढायला वाघाचं काळीज लागतं म्हणणाऱ्या लक्ष्मण हाकेंच्या टीकेवर मनोज जरांगेंचे उत्तर....
Maharashtra Vidhan Sabha Election: निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपली तलवार म्यान केली आहे. विधानसभा लढणार नाही, तर पाडणार, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेवर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जहरी टीका केली आहे. जरांगे हे बारामतीला मॅनेज झाले असून बारामतीच्या स्क्रिप्टनुसार ते वागतात, असा आरोप जरांगेंवर हाके यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर जरांगे यांनी ‘साम टीव्ही’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत निवडणुकीत कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडून आणायचं, यावर भाष्य केले.
लक्ष्मण हाके यांनी केलेल्या आरोपांवर विचारले असता मनोज जरांगे यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला. लक्ष्मण हाके मी विरोधक मानत नाही, असे सांगत त्यांनी हाके यांच्यावर बोलण्यास टाळले. 'लक्ष्मण हाके यांना मी गिनत नाही,' असे जरांगे म्हणाले.
बारामतीकरांच्या सांगण्यावरून जरांगे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. निवडणूक लढायला वाघाचं काळीज लागतं गनिमी काव्याचा काळ गेला, असा टोला हाके यांनी जरांगेंना लगावला आहे.
"निवडणूक लढणं हा आमचा खानदानी धंदा नाही. महायुती, महाविकास आघाडी यापैकी कुणालाही पाठिंबा नाही. याला निवडणूक आणा की याला पाडा, असे मी कुणालाही सांगणार नाही," असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला.
"फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळ केले. आंदोलन करणाऱ्या महिलांवर हल्ला करणारा पहिला माणूस मी पाहिला. या निवडणुकीत फडणवीसांचा सुपडा साफ करायचा आहे. फडणवीस हे भाजपला संपविण्याचे काम करीत आहेत. त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघही नाराज आहे," असे ते म्हणाले. कुणाला पाडणार, कुणाला निवडून आणणार यावर दोन-तीन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.