Election Commission
Election Commission  Sarkarnama
मुंबई

Election Commission : मुंबई महापालिका आयुक्तांनंतर निवडणूक आयोगाचा 34 अधिकाऱ्यांना दणका

उत्तम कुटे

Mumbai News : तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याने मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची बदली करण्याचा आदेश देऊनही ती होऊ नये, यासाठी आग्रही महाराष्ट्र सरकारला केंद्रीय निवडणूक आय़ोगाने चपराक देत त्यांची मागणी फेटाळली. त्यानंतर आणखी नामुष्की टाळण्यासाठी राज्य सरकारने आयोगाच्या आदेशानुसार मंगळवारी (ता. १९) ३४ वरिष्ठ महापालिका अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेतील दोन उपायुक्त आहेत.Election Commission

तीन वर्षे टर्म पूर्ण झालेले आणि स्वत:च्या जिल्ह्यात काम करणारे अशा दोन निकषांवर आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलिस व महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस खात्यात त्या बदल्या झाल्या आहेत. मात्र महसूल विभागाला उशिरा जाग आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, सोमवारी (ता. 18) मुंबई पालिका आयुक्त चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि पी. वेलारासू यांच्या बदल्या करण्यात आल्या. तर, आज हा वरंवटा आणखी 34 अधिकाऱ्यांवर फिरविण्यात आला. त्यांच्या बदल्या इतक्या घाईने करण्यात आल्या आहेत, की त्यांना पोस्टिंगही देण्यात आलेली नाही. तातडीने बदलीच्या ठिकाणी त्यांना हजर होण्यास बजावण्यास आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपायुक्त (क्रीडा आणि जनसंपर्क) मिनीनाथ दंडवते हे फक्त आठ महिन्यांपूर्वीच आलेले होते. या बदल्यांत त्यांचीही उचलबांगडी करण्यात आलेली आहे. ते पुणे जिल्ह्यातील शिरूरचे रहिवासी असल्याने त्यांना जिल्ह्याबाहेर पाठवले आहे, तर पिंपरी महापालिकेचे दुसरे उपायुक्त अजय चारठणकर यांची तीन वर्षांची सेवा झाल्याने त्यांचीही बदली करण्यात आली.

वसई-विरार, नवी मुंबई, सांगली-मिरज-कुपवाड, भिवंडी-निजामपूर, नगर, लातूर, चंद्रपूर, पनवेल, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नांदेड-वाघाळा या महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांचा बदल्या करण्यात आलेल्या आहेत.

अनेक अधिकाऱ्यांना सुपर दणका

दरम्यान, बदली झालेल्या काही अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावून क्रीम पोस्टिंग मिळवली होती. मात्र, आय़ोगाने त्यावर पाणी फिरवले. त्यामुळे पुढे निवडणूक होणार असेल, तर अशी बदली करून घेणार नाही, अशी व्यथा आज बदली झालेल्या एका पालिका अधिकाऱ्याने 'सरकारनामा'कडे व्यक्त केली. अशीच फसगत याअगोदर बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बाबतीतही झाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT