मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे पेट्रोल साडेनऊ रुपये, तर डिझेल सात प्रतिलिटर स्वस्त होणार आहे. केंद्राच्या या निर्णयाचे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांचे आभार मानले आहेत. तसेच, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज्य सरकारनेही पुढाकार घेत पेट्रोल डिझेलवरील करात कपात करण्याचा सल्ला दिला आहे. (Fadnavis gives this advice to Chief Minister Thackeray after tax cut on fuel!)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इंधनावरील कराच्या कपातीची घोषणा केली. पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रतिलिटर ८ रुपये, तर डिझेलवर ६ रुपयांनी कमी करत अल्याचे त्यांनी म्हटले आहे, त्यामुळे पेट्रोल ९.५ रुपये तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त होणार आहे, असेही त्या म्हणाल्या. केंद्र सरकारने हे पाऊल उचल्यानंतर फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पेट्रोल ९. ५० रु/लिटर, डिझेल ७ रु/लिटरने स्वस्त होणार. पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे ८ रुपये आणि ६ रुपये प्रतिलिटर केंद्रीय कर कमी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अनेकानेक आभार. केंद्रातील मोदी सरकार हे या देशातील सामान्य माणसांचे सरकार आहे, हेच पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिद्ध केले आहे. गरिब कल्याण हा त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आणि त्यासाठी ते सतत झटत असतात. या निर्णयांमधून त्यांनी हेच प्रत्यंतर पुन्हा एकदा दिले आहे.
आता माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की, त्यांनी पुढाकार घेत पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करावी आणि सामान्यांना आणखी दिलासा द्यावा. कारण, महाराष्ट्रातील दर हे सर्वाधिक आहेत. सत्तेतील पक्षांनी रस्त्यावर बसायचे नसते, तर जनतेला दिलासा द्यायचा असतो, असा टोमणाही फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद मोदींनी नुकताच देशातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी वाढत्या पेट्रोल दरांचा मुद्दा उपस्थित केला होता. मोदींनी काही राज्यांतील पेट्रोल दरांचे उदाहरण दिले होते. यात महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह इतर विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांतील पेट्रोल दरांची तुलना त्यांनी भाजपशासित राज्यांतील दरांशी केली होती. ते म्हणाले होते की, जागतिक पातळीवर युद्धसदृश स्थिती आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे सर्वांनीच संघराज्य रचना लक्षात घेऊन सहकार्य करायला हवे. राज्यांनीही पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित करात कपात करावी, अशी सूचना केली होती. त्यावरून राज्य आणि केंद्र असा वादही रंगला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.