Kalicharan Maharaj insults Mahatma Gandhi

 

Sarkarnama

मुंबई

महात्मा गांधींविषयी अपशब्द काढणं कालीचरण महाराजाला भोवलं; रात्रीच घडल्या घडामोडी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत कारवाईचे संकेत दिले होते.

सरकारनामा ब्युरो

अकोला : छत्तीसगढची राजधानी रायपुर (Raipur) येथे आयोजित धर्म संसदेत (Dharma Sansad) अकोला येथील कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी महात्मा गांधीविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याचे पडसाद सोमवारी विधानसभेत उमटले. सत्ताधारी पक्षातील अनेकांनी महाराजांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उचलून धरली होती. त्यानंतर सोमवारी रात्री महाराजांवर अकोल्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कालीचरण महाराज उर्फ अभिजित सराग यांच्या विरोधात रात्री उशिरा सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री काँग्रेसने पोलीस ठाण्यात आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध रात्री उशिरा सामाजिक तेढ निर्माण करणारे प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत गावंडे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कलम 294 व 505 अंतर्गत गुन्हा नोंदवला.

दरम्यान, कालीचरण महाराज यांनी धर्म संसदेत बोलताना गांधीविषयी अपशब्द वापरले. हा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. गांधींविषयी अपशब्द वापरून महाराजांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची नथुराम गोडसे (Nathuram Godse) याने हत्या केल्याचे सांगत गोडसेचे कौतूकही केले. सोमवारी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला.

भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनीही कडक कारवाईची मागणी केली. सदस्यांचे बोलून झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहाला कालीचरण महाराजांवर कारवाई करण्याचे संकेत दिले. या घटनेची माहिती घेवून संबंधितांवर सक्त कारवाई केली जाईल, असं पवारांनी स्पष्ट केलं. कालीचरण महाराजांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या छत्तीसगड पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री त्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कालीचरण महाराजांच्या वक्तव्यावरून काँग्रेसचे नेते संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांनीही ट्विटरवर व्हिडीओ टाकत त्याचा निषेध केला आहे. हा भगवाधारी फ्रॉड राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना उघडपणे शिव्या देत आहे. त्याता लगेच तुरुंगात टाकायला हवे. गांधीविषयी वैचारिक मतभेद असू शकतील, पण त्यांचा अपमान करण्याचा अधिकार कुणालाच नाही, असं निरूपम यांनी म्हटलं आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनीही ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. नरेंद्र मोदीजी, तुम्ही हा देश कसा बनवला. महात्मा गांधींना शिव्या दिल्या जात आहेत. समोर बसलेले लोक टाळ्या वाजवत आहेत. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. हीच खरी महात्मा गांधींना श्रध्दांजली ठरेल, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT