Anil Deshmukh Sarkarnama
मुंबई

Anil Deshmukh News : अनिल देशमुखांना लागली मतदारसंघाची ओढ : म्हणाले, ‘प्रथम मी काटोलला जाणार...’

उच्च न्यायालयाच्या आदेशात ‘अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपप्रकरणी कोणताही सकृतदर्शनी पुरावा आढळलेला नाही. त्यामुळे शंभर कोटींच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही,’ असे निरीक्षण नोंदविले आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : काटोल (Katol) मतदारसंघात जाण्यासाठी तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) काम करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात जाण्यासाठी मला परवानगी द्यावी, अशी मागणी मी उच्च न्यायालयात करणार आहे. न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर मी प्रथम काटोल, नागपूरला जाणार आहे. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाच्या कामासाठी फिरणार आहे, असे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी जामिनावर बाहेर आल्यानंतर सांगितले. (First I will go to Katol... : Anil Deshmukh)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर आर्थर रोड कारागृहातून देशमुख यांची २८ डिसेंबर रोजी सुटका झाली. त्यानंतर ईडीच्या कार्यालयात हजेरी लावण्यासाठी देशमुख आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी परवानगी मिळताच आपण प्रथम काटोलला जाणार आहोत, असे सांगितले.

देशमुख म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावण्यासाठी आलो होतो. उच्च न्यायालयाच्या आदेशात ‘अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपप्रकरणी कोणताही सकृतदर्शनी पुरावा आढळलेला नाही. त्यामुळे शंभर कोटींच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही,’ असे निरीक्षण नोंदविले आहे. ईडीच्या आरोपांबाबत सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाच्या मतावर शिक्कामोर्तब केलेले आहे.

माझ्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी आरोप केले होते. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओमध्ये जिलेटीन ठेवण्यात आले होते. त्या प्रकरणी आणि स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणामुळे परमवीर सिंह यांची मी खालच्या पदावर बदली केली होती. त्यानंतर लगेचच त्यांना सस्पेंडही केले होते. सचिन वाझे याची जिलेटिन ठेवल्याप्रकरणी एनआयए चौकशी सुरू होती. त्यालाही सस्पेंड करून सरकारी नोकरीतून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे परमवीर सिंह आणि वाझे यांनी एकत्रित येत माझ्यावर हे खोटे आरोप केले होते. उच्च न्यायालयानेही माझ्यावरील आरोपाप्रकरणी कोणताही सकृतदर्शनी पुरावा नाही, असे म्हटलेले आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

देशमुख म्हणाले की, माझ्यावर शंभर कोटी वसुलीचा आरोप झाला होता. पण, माझ्यावर जे न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले होते. त्यात एक कोटी ७१ लाख रुपयांचा उल्लेख होता. म्हणजे आरोप शंभर कोटींचा झाला आणि आरोपपत्रात तो १ कोटी ७१ लाखांवर आला. त्याच्यातही काही तथ्य नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपप्रकरणी सकृतदर्शनी कोणतेही पुरावे नाहीत, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले आहे.

सचिन वाझे याची एनआयएकडून सध्या चौकशी करण्यात येत आहे. त्या चौकशीत काय निघतं ते पाहू, असे उत्तर वाझेवर कठोर कारवाई होत नसल्याच्या प्रश्नावर अनिल देशमुख यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT