कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे (shivsena)खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचा उद्या (शुक्रवारी, ता. ३ फेब्रुवारी) वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाचे (bjp) कल्याणमधील माजी नगरसेवक दया गायकवाड यांनी बॅनर लावून खासदार शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेनेच्या खासदारांना भाजपच्या नेत्याकडून जाहीररित्या फ्लेक्स लावून शुभेच्छा दिल्याने कल्याणमध्ये अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. (Former BJP corporator planted MP Dr. Shrikant Shinde's Birthday Banner)
शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबत असलेली युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा करून महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात सत्ता स्थापन केली आहे. भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. तेव्हापासून राज्यातील भाजप-शिवसेना नेत्यांमधून विस्तवही जात नाही. दोन्ही बाजूचे नेते सतत एकमेकांवर तोंडसुख घेत असतात. त्यामुळेच गायकवाड यांनी खासदार शिंदे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा बॅनर लावल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, राज्यस्तरावर युती तुटल्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेतही शिवसेना-भाजपने युती तोडली आहे. तेव्हापासून शिवसेना-भाजप एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता मार्चमध्ये महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे इच्छुकांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. मात्र, शिवसेना खासदार डॉ. शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे माजी नगरसेवक दया गायकवाड यांनी शुभेच्छांचे फलक लावल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर खासदार शिंदे यांच्या विकास कामांची नोंद असून हे बॅनर समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.
शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे चांगले व्यक्तिमत्त्व आहेत. सर्वसामान्य नागरिकांची कामे त्यांच्याकडून होत आहेत; म्हणून मी त्यांच्या वाढदिवसाचा बॅनर लावला. माझा हेतू स्पष्ट आहे, त्यावर उलट-सुलट चर्चा होते तर मी काय करू. चिंता नसावी, मी भारतीय जनता पक्षामधूनच निवडणूक लढणार असल्याचे स्पष्टीकरण भाजपचे दया गायकवाड यांनी दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.