Anil Parab  Sarkarnama
मुंबई

मोठी बातमी : अनिल देशमुखांनी आता अनिल परबांना आणलं चांगलंच अडचणीत

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) अटक केली होती.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) अटक केली असून, त्यांचा मुक्काम सध्या आर्थर रोड तुरूंगात आहे. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अनधिकृत याद्या पाठवायचे, अशी कबुली राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी ईडीसमोर नुकतीच दिली होती. आता ईडीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रातून देशमुखांनी केलेला गौप्यस्फोट समोर आला असून, शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) अडचणीत आले आहेत.

ईडीने अनिल देशमुखांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यात देशमुखांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी अनिल परबांकडे बोट दाखवल्याचे समोर आले आहे. या आरोपपत्रात देशमुखांचा जबाब आहे. परब यांनी दिलेली यादीच मी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. जबाबात त्यांनी म्हटले आहे की, यादीतीत नावे आहेत त्यांची हव्या त्या ठिकाणी बदली करावी, असे सांगण्यात आले होते. या यादीची कुठेही नोंद नसून ही यादी मी पुढे पाठवली होती. अनिल परब यांना शिवसेनेचे आमदार जवळच्या अधिकाऱ्यांची यादी द्यायचे. त्यानंतर ते मला ही यादी पाठवायचे.

दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात देशमुख माझ्याकडे अनधिकृत याद्या पाठवत होते, असा खळबळजनक दावा सीताराम कुंटेंनी ईडीसमोर केला होता. मुख्य सचिव म्हणून गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात कुंटे निवृत्त झाले आहेत. यानंतर त्यांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सल्लागारपदी नियुक्ती झाली आहे. कुंटे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील अधिकारी मानले जातात. देशमुखांवरील शंभर कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांबाबत ईडीने कुंटे यांचा जबाब नोंदवला होता. त्यांनी म्हटले आहे की, देशमुख गृहमंत्री असताना पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी याद्या पाठवायचे. यावर कुठल्या अधिकाऱ्याची कुठे बदली करायची याचा उल्लेख असायचा. देशमुखांचा स्वीय सहाय्यक संजीव पालांडे हा याद्या पोचवायचा. देशमुख हे गृहमंत्री असल्याने मी यासाठी नकार देऊ शकत नव्हतो. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार मी बदल्या करीत होतो.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवले होते. त्या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर सचिन वाझेमार्फत 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी झालेल्या चौकशीनंतर अनिल देशमुखांना गेल्या वर्षी 1 नोव्हेंबरला अटक केली होती. या प्रकरणी देशमुख सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. देशमुखांच्या विरोधात तब्बल 7 हजार पानांचे आरोपपत्र ईडीकडून दाखल करण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT