मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांच्याबाबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवलेली मोटार (Antilia Case) सापडल्या प्रकरणी माहिती देत असताना परमबीरसिंह हे थरथर कापत होते, असे देशमुखांनी म्हटले आहे.
परमबीरसिंह यांनी देशमुखांवर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चांदीवाल समिती (Chandiwal Committee) नेमली आहे. या समितीसमोर देशमुखांना आज हजर करण्यात आले. समितीसमोर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचे वकील योगेश नायडू यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना देशमुखांनी अनेक खुलासे केले. त्यापैकी अँटिलिया प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून ते एटीएसकडे हस्तांतरित करु नये, अशी परमबीरसिंह यांची इच्छा होती, असा खुलासा देशमुखांनी केला. देशमुख म्हणाले की, अँटिलिया प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्याची सूचना त्यावेळी बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांनी केला होती. याला परमबीरसिंहांनी विरोध करून मुंबई पोलिसांनीच तपास करावा, अशी भूमिका घेतली होती. मी हे प्रकरण 6 मार्च 2021 रोजी एटीएसकडे दिले होते. यानंतर गुन्हे गुप्तवार्ता विभागातून (CIU) मी सचिन वाझेची हकालपट्टी केली होती, असेही देशमुखांनी समितीसमोर आज सांगितले.
वाझे नियम पाळत नाही, असे तुम्हाला केव्हा वाटले, असे देशमुखांना विचारल्यानंतर ते म्हणाले की, वाझे नियम पाळत नसल्याचे गेल्या वर्षी 25 फेब्रुवारीला पहिल्यांदा लक्षात आले. त्यावेळी जिलेटिनने भरलेली स्कॉर्पिओ मोटार सापडली होती. याचा तपास परमबीरसिंह यांनी 26 फेब्रुवारीला थेट वाझेकडे सोपवला. मात्र, त्यानंतर १ मार्चला वाझेला तपासातून हटवून एसीपी नितीन अलकनुरे यांना तपास अधिकारी करण्यात आले. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरण हत्येचा मुद्दा ५ मार्चला उपस्थित केला होता. वाझेची बदली आणि निलंबनाची मागणी त्यांनी केली होती.
मी 3 अतिरिक्त सचिवांच्या उपस्थितीत परमबीरसिंह यांना त्यावेळी फोन केला होता. अँटिलिया आणि मनसुख खून प्रकरणात तुम्ही सरकारला अंधारात कसे ठेवू शकता, अशी विचारणा मी केली होती. मी प्रश्न विचारताच ते थरथर कापू लागले होते. आम्ही अँटिलिया प्रकरणाची अधिक माहिती विचारली असता परमबीरसिंह हादरले होते. वाझे या सगळ्यात गुंतला असल्याचे माहिती नव्हते, असे परमबीरसिंह म्हणाले होते, असे देशमुखांनी समितीसमोर सांगितले. दरम्यान, चांदीवाल समितीची सुनावणी जवळपास पूर्ण झाली असून फेब्रुवारीच्या अखेरीस या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल सादर केला जाणार आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील आणि बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यातील संवादाविषयी परमबीरसिंह यांनी सादर केलेला व्हॉटसअॅपवरील मजकूर आणि परमबीरसिंह यांची बदली झाल्यानंतर त्यांनी पत्राद्वारे जाहीर केलेले आरोप याच्या परस्पर संबंधांची शहानिशा चांदीवाल समिती करीत आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर स्फोटके असलेली मोटार सापडली होती. याप्रकरणी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांची राज्य सरकारने बदली केली होती. या बदलीनंतर परमबीरसिंह यांनी थेट गृहमंत्र्यांकडून पैसे वसुलीसाठी दबाव असल्याचा आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.