Thane News: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार तसेच ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी राज्यातील विद्यमान सरकार घटनाबाह्य आहे, असा दावा केला आहे. तसेच त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
ठाण्याच्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये मंगळवारी (ता.२३) "चला या, मा.सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजून घेऊ या.." या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
परांजपे म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने निकाल दिला आहे. त्याकडे पाहता, अंतिम निकाल येईपर्यंत हे सरकार घटनाबाह्यच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या १४१ पानांच्या निकालपत्राचे विश्लेषण होणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि श्रीकांत शिंदे हे जनतेची दिशाभूल करीत आहेत", अशी टीका त्यांनी केली.
"सध्या खोटे बोल पण रेटून बोल, अशी प्रवृत्ती वाढीस लागली आहे. हा खोटेपणा उघडकीस आणण्याची सुरूवात ठाण्यातून करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात अनेक निरीक्षणे नोंदविली आहेत", असंही ते म्हणाले.
"२५ नोव्हेंबर २०१९ रोजी शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना देण्यात आले. विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची तर प्रतोदपदी सुनील प्रभू यांची नियुक्ती करून व्हीप बजावण्याचे सर्व अधिकार प्रभू यांना देण्यात आले होते. शिंदे गटाने गद्दारी केल्यानंतर २१ जून २०२२ रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटनेतेपदी अजय चौधरी आणि प्रतोदपदी सुनील प्रभू यांची नियुक्ती केली होती", असंही ते यावेळी म्हणाले.
"फुटीर गटाने बैठक घेऊन २२ जून २०२२ ला गटनेतेपद एकनाथ शिंदे यांना देऊन भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती केली होती. मात्र, कोर्टानेही तत्कालीन परिस्थितीत गटनेता आणि प्रतोद नेमणुकीचे अधिकार हे राजकीय पक्षाला आहेत, असे सांगून गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरविली. त्यामुळे गटनेते म्हणून अजय चौधरी यांनाच ग्राह्य मानावे, तसेच व्हिप बजावण्याचा अधिकार हा प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांनाच आहे, असं न्यायालयाने म्हटलं आहे", असं परांजपे यांनी सांगितलं.
दरम्यान, यावेळी श्रीकांत शिंदे यांच्यावरही परांजपे यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, "श्रीकांत शिंदे हे डॉक्टर आहेत. पण, त्यांचा कायद्याचा अभ्यास किती आहे, हे आपणाला माहित नाही. त्यांनी निकालपत्र आधी अभ्यासावे. त्यानंतर त्यावर बोलावे", असा टोला लगावला.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.