Thane, 15, February : तुम्हाला लयच खुमीखुमी असेल तर आगामी लोकसभा निवडणुकीत तुम्ही किंवा तुमच्या मुलांना कल्याण अथवा ठाणे जिथं उभं राहायचं आहे, तिथं उभं राहावा. ओपन चॅलेंज, तुमच्या विरोधात हा डॉ. श्रीकांत शिंदे उभा राहील. महायुतीच्या नेत्यांनाही माझी एक विनंती आहे की, गणेश नाईकांची जी खुमखुमी आहे, ती जिरवण्याची ताकद आमच्यात आहे, असे खुले चॅलेंज डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना दिले.
वनमंत्री गणेश नाईक यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांना माजी करून टाकू, असं म्हटलं होतं. त्यावर पलटवार करताना डॉ शिंदे यांनी नाईक कुटुंबीयांना विरोधात लोकसभा निवडणूक लढविण्याचे चॅलेंज दिले आहे. ते म्हणाले, गणेश नाईक यांना वयानुसार स्मृतीभ्रंश झाला आहे, त्यात विसरभोळेपणा, चीडचीड, मागच्या गोष्टी न आठवणं, दिशाभूल होणं, व्यक्तीमत्वामध्ये बदल होत असतात. मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे हे सांगू शकतो.
श्रीकांत शिंदे यांना माजी करून टाकू, असं ते म्हणाले आहेत. माझं त्यांना एवढचं सांगणं आहे की, गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या कुटुंबात त्यांची दोन मुलं आणि ते स्वतः माजी झालेले आहेत. त्यांना लोकांनी माजी केलेले आहे. आनंद परांजपे या नवख्या तरुणाला गणेश नाईकांच्या मुलाच्या विरोधात उभं करून निवडून आणण्याची किमया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. एकदा नव्हे; तर दोनदा माजी करण्याचे काम केलेले आहे. त्यांच्याच पक्षाच्या मंदा म्हात्रे यांनीही त्यांना माजी करण्याचे काम केलेले आहे, असा टोलाही श्रीकांत शिंदेंनी लगावला.
ते म्हणाले, गणेश नाईक यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी मुलाचाही बळी घेतला. त्या मुलाला आताच्या निवडणुकीत माजी करण्याचे काम जनतेने केले आहे. ज्याच्या घरात तीन तीन लोक माजी आहेत, त्यांनी एकनाथ शिंदे आणि आम्हाला माजी करण्याचे बोलू नये. त्यांना या सर्व गोष्टींचा विसर पडलेला आहे.
माझ्या कल्याण लेाकभा मतदारसंघात येणाऱ्या साडतीन महापालिका शिवसेनेने स्वतःच्या ताकदीवर ताब्यात घेतलेल्या आहेत. कोणाला सोबत घेऊन आणि कोणाच्या भरोशावर ही सत्ता स्थापन केलेली नाही. आगामी काळात ज्या काही गोष्टी घडणार आहेत, त्या तुमच्यासमोर येणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ या ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे. नवी मुंबई महापालिकेत दहा जागा आमच्या चुकीमुळे कमी झाल्या आहेत. त्यामुळे एक महापालिका घेऊन वल्गना करणं, अरं हा श्रीकांत शिंदे साडेतीन महापालिकेच्या निवडणुका लढवतो आणि जिंकतो. तीन वेळा लोकांनी मला लोकसभेला निवडून दिलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नाईकांची जी काही खुमखुमी राहिलेली आहे, ती जिरवण्याची आमची तयारी आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नादाला तुम्ही लागा;पण डॉ श्रीकांत शिंदेंच्या नादाला तुम्ही लागू नका, असे ओपन चॅलेंजही खासदार श्रीकांत शिंदे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.