Mahesh Gaikwad Sarkarnama
मुंबई

Mahesh Gaikwad : गणपत गायकवाडांच्या गोळीबारातील जखमी महेश गायकवाडांच्या अडचणीत वाढ; आता खंडणीचा गुन्हा

सरकारनामा ब्यूरो

Thane Political News : भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेले शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गायकवाड यांच्यासह पाच जणांवर शुक्रवारी खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

या पाच जणांनी आम्हाला तुमच्या जमिनीतील अर्धी जमीन द्या, अन्यथा आम्हाला पाच कोटी द्या अशी खंडणी स्वरुपात मागणी केल्याची तक्रार नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक एस. बी. खान यांनी केली. या तक्रारीनंतर उल्हासनगर येथील हिललाईन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मलंगगड कुशीवली गावातील श्यामसुंदर लक्ष्मण पाटील यांची 27 एकर जमीन आहे. ती जमीन महसूल विभागाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून नवी मुंबई सीबीडी बेलापूर येथील बांधकाम व्यावसायिक एस. बी. खान यांनी खरेदी केली होती. त्यांची एफएस ग्रुप ऑफ कंपनीज ही बांधकाम कंपनी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खरेदीचा व्यवहार पूर्ण झाल्यावर, जमिनीचा सात बारा उतारा खान यांच्या नावे झाला. त्यानंतर त्यांनी 2019 मध्ये अंबरनाथ भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून जमीन मोजणी करून घेतली. त्यावेळी मलंगवाडीतील शेवंताबाई मुका फुलोरे आणि इतरांनी त्यास विरोध करत, शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, ऑगस्ट 2023 मध्ये जमीन मालक असलेले खान यांच्या जमिनीवर ‘ही जमीन महेश दशरथ गायकवाड (Mahesh Gaikwad) आणि इतर यांच्या कब्जे वहिवाटीची आहे. या जमिनीत कोणी अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल’ असा नामफलक लावला होता. मालकीच्या जमिनीवरील बेकायदा फलक खान यांनी काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला त्यांनी विरोध केला.

आम्हाला तुमच्या जमिनीतील अर्धी जमीन द्या, अन्यथा आम्हाला पाच कोटी द्या, अशी मागणी पाच जणांनी खान यांच्याकडे ऑगस्ट ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत केल्याचे तक्रारीत खान यांनी नमूद केले आहे. त्यानुसार महेश गायकवाड यांच्यासह यशवंत मुका फुलोरे, रोहिदास मुका फुलोरे, गणेश यशवंत फुलोरे, शेवंतीबाई मुका फुलोरे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अधिक तपास हिललाईन पोलिस (Hill line Police) करीत आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT