BJP-Shinde Group Politics :  Sarkarnama
मुंबई

Kalyan-Dombivali Politics : भाजपचे गणपतराव गायकवाड श्रीकांत शिंदेंना इंगा दाखवणार?

शर्मिला वाळुंज

Kalyan Dombivali Political News : कल्याण लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत होते. पण त्यांनी स्वतःच खासदार श्रीकांत शिंदे हेच पुढील युतीचे उमेदवार असतील, असं जाहीर केलं आणि या वादावर पडदा टाकला. हा वाद काहीसा शमलेला असतानाच मनसे आमदार राजू पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार असा उल्लेख असलेला केक कापला आणि पुन्हा नवा वाद सुरू झाला.

राजू पाटील लोकसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा सुरू झाली, पण भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मात्र "आमचे उमेदवार खासदार श्रीकांत शिंदेच असतील. राजू पाटील यांनी जरी कंबर कसली असेल तर त्यांना शुभेच्छा," अशा शब्दांत त्यांना शुभेच्छाही दिल्या.

गेल्या काही महिन्यांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटात उघड उघड मतभेद सुरू आहेत. कल्याण लोकसभेवर दावा करण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांत स्थानिक पातळीवर जोरदार संघर्ष सुरू होता. आमदार रवींद्र चव्हाण आणि संजय केळकर यांच्या नावांचीही चर्चा होती. त्यातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही ही जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता वर्तवली होती.

मात्र, मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या वादावर पडदा टाकत कल्याण लोकसभेची जागा ही खासदार श्रीकांत शिंदे हेच लढवतील, असे जाहीर करून टाकले. चव्हाणांच्या या वक्तव्याने हा वाद काहीसा शांत झालेला असतानाच आमदार राजू पाटील लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली. पण मनसे आणि मुख्यमंत्र्यांमधील मैत्रीपूर्ण संबंध पाहता मनसेने श्रीकांत शिंदेंविरोधातच दंड थोपटले का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

काही दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदे विकासकामांसाठी सहकार्य करत नसल्याचा आरोप गणपतराव गायकवाड यांनी केला होता. इतकेच नव्हे तर या वेळी त्यांनी थेट राजू पाटील यांची बाजू घेतली होती. याविषयी गायकवाड यांना विचारले असता ते म्हणाले, श्रीकांत शिंदे हेच आमचे उमेदवार असतील, पण राजू पाटील यांनी जर कंबर कसली असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पण तिकीट कोणाला द्यायचं हे पक्षश्रेष्ठीच ठरवतील. आमचा पक्ष आणि आम्ही एकत्रच आहोत आणि आम्ही एकत्र काम करू.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT