Ashish Shelar-Bhaskar Jadhav
Ashish Shelar-Bhaskar Jadhav Sarkarnama
मुंबई

Assembly Session : गोऱ्हेंची नार्वेकरांवर टिपण्णी : विधानसभेत आशिष शेलारांचा वार; तर भास्कर जाधवांचा पलटवार

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधानसभा अध्यक्षांबाबत केलेली टिपण्णीवरून विधानसभेत आज (ता. १७ मार्च) सकाळीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरीतुमरी झाली. भाजपचे आमदार आशिष शेलार आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव हे समोरासमोर आले. (Gorhe's remarks on Narvekar: Ashish Shelar-Bhaskar Jadhav came face to face in the Assembly)

विधीमंडळाच्या आवारातील एका कार्यक्रमाबद्दल नीलम गोऱ्हे यांना माहिती देण्यात आली नव्हती. त्याबाबत विधान परिषदेत झालेल्या चर्चेत गोऱ्हे यांनी नाराजी व्यक्त करत नार्वेकर यांच्यावर काही आरोप केले होते. त्यावरून विधानसभेत आज सकाळीच शेलार यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर अध्यक्षांनीही आपले मत नोंदविली आहे.

आमदार आशिष शेलार म्हणाले की, विधान परिषदेत विधानसभेच्या अध्यक्षांच्या अधिकाराबद्दल चर्चा झाली. दोन्ही सभागृहाने एकमेकांचे मान सन्मान राखून काम करणे गरजेचे आहे. खरं तर दोन्ही सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी एकत्रित बसून निर्णय घेणे आवश्यक आहे. पण, विधान परिषदेत काल ‘पॉईंट ऑफ ऑर्डर’द्वारे सदस्य बोलले आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भाष्य करत काही निर्णय दिले आहेत.

विधीमंडळाच्या कामकाजासंदर्भात मार्गदर्शन आहे. त्यातील काही निवडक परिच्छेद पुढीलप्रमाणे...

अनुच्छेद १७१ मध्ये : विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचे अधिकार

अनुच्छेद १७९ मध्ये : अध्यक्ष आणि उपाध्यक्ष रिक्त असेल, त्यांना पदावरून दूर करणे आदीबाबत मार्गदर्शन आहे.

अनुच्छेद १८० मध्ये : उपाध्यक्ष आणि अन्य व्यक्तींनी अध्यक्ष म्हणून कर्तव्ये पार पाडण्याचा अधिकार आहे.

अनुच्छेद १८२ मध्ये : विधान परिषदेचे सभापती-उपसभापती निवडीचे अधिकार आहेत.

अनुच्छेद १८३ मध्ये : सभापती-उपसभापतींचे पद रिक्त झाले तर काय यासंदर्भात मार्गदर्शन आहे. तसेच, या सर्व परिस्थिती सभापती नसतात, त्यावेळच्या कार्यपद्धतीचाही उल्लेख आहे, असेही शेलार यांनी स्पष्ट केले.

विधानसभेच्या अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयावर भाष्य करून कोणते सभागृह वरिष्ठ? अशा पद्धतीचे चित्र निर्माण केले जात आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनीया संदर्भात स्पष्टता दिली पाहिजे. दोन्ही सभागृह आमच्यासाठी सन्मानीय आहेत. त्यातून निर्देश बाहेर जाणे योग्य नाही, अशी नाराजीही आशिष शेलार यांनी व्यक्त केली.

आशिष शेलार यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर भास्कर जाधव म्हणाले की, आशिष शेलार यांनी मूलभूत प्रश्नाला हात घातला आहे. पण, त्यांनी सोयीचं होतं तिथंपर्यतच वाचलं आहे. पण त्या वादात मी आता जणार नाही. कुठल्याही कार्यक्रमात विधान परिषद सदस्यांचे नाव वर असतं. खाली विधानसभा सदस्यांचं नाव असतं.

सभापती आणि अध्यक्षांनी एकत्रितपणे काम करणे अपेक्षित आहे. विधान परिषदेच्या उपसभापतींना आपण विश्वासात घेतले नाही, अशी चर्चा बाहेर आली आहे. ती बाहेर यायला नको होती, या मताचा मीही आहे. पण, मानसन्मानात वरच्या सभागृहाचाच मान पहिला आहे, त्यामुळे सभापतींचे नाव पहिलं असतं आणि अध्यक्षांचं नाव दुसऱ्या क्रमांकावर असतं. या विषयावर आणखी स्पष्टता येणे गरजेचे आहे, असेही भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले.

भास्कर जाधव यांनी केलेल्या आरोपाला आशिष शेलार यांनी पुन्हा उत्तर दिले. ते म्हणाले की, मी कोणताही मुद्दा सोडलेला नाही. तसेच, मानसन्मान हा शब्द मी वापरलेलाच नाही. कोणत्या सभागृहाला मानसन्मान द्या, असेही बोललो नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT