Uddhav Thackeray, Bhagat Singh Koshyari, Aditya Thackeray
Uddhav Thackeray, Bhagat Singh Koshyari, Aditya Thackeray sarkarnama
मुंबई

ठाकरे सरकारवर राज्यपाल खूश; महाराष्ट्र दिनी केला कौतुकाचा वर्षाव

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : कोरोना (Corona) काळ असूनही राज्याने प्रगती आणि विकास यात कुठेही खंड पडू दिला नाही. महाराष्ट्राने देशातले एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले पहिले राज्य होण्यासाठी विकासाची पंचसूत्री ठरविली, असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) म्हणाले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), रश्मी ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे , विविध विभागांचे सचिव, प्रधान सचिव, तीनही सेनादलांचे वरिष्ठ अधिकारी, विविध देशांचे वाणिज्य दूत, विशेष निमंत्रित आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी राज्याला संबोधित करताना राज्यपाल म्हणाले, कोरोनाच्या तीन लाटांचा नियोजनबद्ध रीतीने सामना करीत असताना महाराष्ट्राने देशात एक उदाहरण निर्माण केले. राज्यातल्या ९२ टक्क्यांपेक्षा अधिक प्रौढ लोकसंख्येला लसीचा कमीत कमी एक डोस दिला असून उर्वरित लसीकरण गतीने पूर्ण होत आहे. नीती आयोगाने जाहीर केलेल्या Export Preparedness Index मध्ये महाराष्ट्र राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. याचा आनंद व्यक्त करून केंद्र शासनाच्या 'सुशासन निर्देशांक अहवाल- २०२१' मध्ये महाराष्ट्राने दुसरे स्थान मिळविले असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यपाल म्हणाले, इलेक्ट्रिक वाहनांबाबत राज्य शासनाने तयार केलेले धोरण व्यापक व सर्वांगिण असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी १५७ टक्क्यांनी वाढली. इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या नागरिकांना तसेच गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शहरे कार्बन न्यूट्रल करण्याच्या अनुषंगाने राज्यातील ४३ अमृत शहरे रेस टू झिरोमध्ये सहभागी झाली आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ४८८ शाळा आदर्श शाळा म्हणून पहिल्या टप्प्यात विकसित करण्यात येणार आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर देण्यात यावा याकरिता शासन केंद्राकडे पाठपुरावा करत आहे. मुंबई येथे मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन झाले असल्याचेही राज्यपालांनी सांगितले.

ग्रामीण भागात महाआवास योजनेतून पावणेपाच लाख घरे देण्यात आली आहेत. जल जीवन मिशनमध्ये १७४ पाणीपुरवठा योजना सुरू होत आहेत. १०० कोटी रुपये रकमेचा स्टार्टअप फंड उभारण्याचे काम सुरु आहे. तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात होतकरू युवक-युवतींच्या मंजूर प्रकल्पांतून सुमारे १ हजार १०० कोटी रूपये गुंतवणूक होत आहे. कोरोना संकटकाळात गरीब आणि गरजूंना शिवभोजन थाळी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात आली होती. सध्या राज्यात १ हजार ५४९ शिवभोजन केंद्रे सुरू आहेत. ९ कोटी १८ लाख इतक्या शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आल्याचे राज्यपालांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT