Gunaratna Sadavarte
Gunaratna Sadavarte sarkarnama
मुंबई

पोलिसांची निराशा ; सदावर्तेंना फक्त दोन दिवस कोठडी

सरकारनामा ब्युरो

मुंबई : आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी काल अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दगडफेक आणि चप्पलफेक करत गोंधळ घातला.

शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी गावदेवी पोलिसांनी काल रात्री एसटी संपकऱ्याचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte)यांना अटक केली होती. याप्रकरणी सदावर्ते यांना फक्त दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सिल्वर ओक येथील हल्ल्याप्रकरणी आज दुपारी किल्ला कोर्टात सदावर्ते यांच्यासह यातील ११० आरोपींना हजर करण्यात आले. ''सदावर्ते यांच्यावर आरोप गंभीर असून त्यांना १४ दिवस पोलीस कोठडी द्यावी,'' अशी मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात केली. सदावर्ते यांनी चिथावणी दिल्याने हा हल्ला झाला असल्याचे घरत यांनी सांगितले. सर्वच आरोपींना १४ दिवस पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी घरत यांनी यावेळी केली. हल्ल्यात भाडोत्री गुंड होते, यात पोलिसांनाही गंभीर दुखापत झाल्याचे घरत यांनी न्यायालयात सांगितले.

सदावर्ते यांच्यावतीने अँड महेश वासवानी यांनी बाजू मांडली. ''मुंबईत आंदोलन करा, असा उल्लेख केला नव्हता, बारामतीत आंदोलन करा असं म्हटलं होते, घरात घूसून आंदोलन करा, असा उल्लेख केला नव्हता, असे सदावर्ते यांच्यावतीने वकीलांनी सांगितले. ''हल्ला झाला तेव्हा सदावर्ते हे मॅट कोर्टात होते,'' असा दावा त्यांच्या वकीलांनी केला आहे. वासवानी यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. घरत यांच्याकडून या अर्जाला विरोध करण्यात आला.

शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’या निवास स्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी एसटीच्या आंदोलक कर्मचाऱ्यांचे वकिल ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना दीड तासाच्या चौकशीनंतर मुंबईच्या गावदेवी पोलिसांकडून शुक्रवारी (ता. ८ एप्रिल) रात्री दहाच्या सुमारास अटक करण्यात आली. इतर १०५ एसटी कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेतले होते. आज शनिवारी (ता. ९ एप्रिल) त्यांच्यासह ११० जणांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. ११० आरोपींनी न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींना न्यायालयाच्या बाहेर काढण्यात आले, एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने अँड संदीप गायकवाड यांनी काम पाहिले. ''एसटी कर्मचारी हे गुन्हेगारी प्रवृत्तीने नाही, ते आरोपी नाहीत,'' असा युक्तीवाद गायकवाड यांनी केला. यावेळी सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील या न्यायालयात उपस्थित होत्या.

मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील याचिकेवर महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. याच निर्णयाचं एसटी कर्मचाऱ्यांकडून स्वागतही करण्यात आलं, मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल (८ एप्रिल) काही एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी धडक दिली. संतप्त कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकच्या दिशेनं दगडफेक केली. त्याचबरोबर चप्पलाही भिरकावल्या. अचानक झालेल्या या घडामोडीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT