Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडविल्याप्रकरणी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा वादात सापडला आहे. या प्रकरणी त्याच्यावर बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय त्याच्यावर कायद्याने जी काही कडक कारवाई करता येईल ती करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसेच त्याने माफी मागितली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दुसऱ्या बाजूला ज्या स्टुडिओमध्ये हा व्हिडीओ शूट झाला त्या हॅबिटॅट स्टुडिओलाही हे प्रकरण चांगलंच अंगलट आलं आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच स्टुडिओची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या प्रकरणी आतापर्यंत 40 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला आहे. यात 11 जणांना अटक करण्यात आले होते. त्या सर्वांना जामीनही मंजूर झाला आहे.
यापूर्वी याच स्टुडिओमध्ये वादग्रस्त India's Got Latent या शो देखील शूट झाले होते. याच शोमध्ये युट्यूबर रणवीर अल्लाहबादिया याने आई आणि वडिलांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन कमेंट केल्या होत्या. तेव्हाही या वादग्रस्त कंटेटवर जोरदार टीका झाली होती. आता कुणाल कामरा याच्या शोमुळेही हा स्टुडिओ वादात सापडला आहे. मात्र या तोडफोडीनंतर हॅबिटॅटने स्टुडिओ बंद करत असल्याची घोषणा केली आहे.
इंस्टाग्रामवर पोस्ट करत स्टुडिओ मालकाने ही माहिती दिली. नुकत्याच आमच्या स्टुडिओवर झालेल्या तोडफोडीच्या घटनेमुळे आम्हाला धक्का बसला आहे आणि खूप दुःखही झाले आहे. कलाकार व्यक्त करत असलेल्या विचारांसाठी आणि सादर करणाऱ्या रचनात्मक गोष्टींसाठी तेच पूर्णपणे जबाबदार असतात. कोणत्याही कलाकाराने सादर केलेल्या कंटेंटसोबत आमचा संबंध नसतो.
परंतु अलीकडील घटनांमुळे आम्हाला पुन्हा विचार करायला लावले आहे. जेव्हा जेव्हा एखादा कलाकार मर्यादा ओलांडतो तेव्हा आम्हाला कसे दोषी ठरवले जाते आणि लक्ष्य केले जाते. आमच्या स्टुडिओमधून फक्त चांगला आणि हितकारी कंटेंट सादर केला जावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोणाच्याही अभिव्यक्ती भावना दुखावणार नाही किंवा अपमान करणार नाही अशा कंटेंटचं संतुलन कसं साधायचं यावर उपाय शोधेपर्यंत आमचा वेन्यू आणि कार्यक्रम बंद ठेवत आहोत.
आम्ही सर्व कलाकार, प्रेक्षकांना आणि शेअर होल्डर्सना चर्चा करण्यासाठी आणि मोकळेपणाने त्यांचे विचार मांडण्यासाठी आमंत्रित करत आहोत. आम्ही कलाकारांच्या अधिकारांचा देखील आदर करू शकू यासाठी तुमचे मार्गदर्शन मागत आहोत, असे या स्टुडिओ मालकाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस तरी हॅबिटॅट स्टुडिओ बंद असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.