Anil Parab, Rajesh Tope, Nitin Raut
Anil Parab, Rajesh Tope, Nitin Raut Sarkarnama
मुंबई

कोरोनाकाळात मंत्र्यांचे 'खासगी'त उपचार अन् लाखांची बिलं फाडली सरकारच्या नावावर

सरकारनामा ब्युरो

मुंबई : कोरोना (Covid 19) काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांची खासगी रुग्णालयांनी आर्थिक लूट केल्याची अनेक प्रकरणं समोर आली. लाखो रुपयांच्या बिलांनी सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं. पण आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यासह अनेक मंत्र्यांनी या काळात खासगी रुग्णालयांतील उपचारांची बिलं सरकारी तिजोरीतून दिली आहेत. बहुतेक मंत्र्यांनी खासगी रुग्णालयांना प्राधान्य दिल्याचे यातून स्पष्ट झालं आहे.

मंत्र्यांना नियमानुसार वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती सरकारी तिजोरीतून करता येते. पण एकीकडे कोरोना काळात अनेक नागरिकांवर आर्थिक बोजा पडलेला असताना मंत्र्यांकडून सरकारी तिजोरीवर टाकलेल्या भारावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, 2020 ते 22 या कालावधीत मंत्र्यांच्या वैद्यकीय उपचारांच्या 29 बिलांची प्रतिपूर्ती सरकारी तिजोरीतून करण्यात आली आङे. ब्रीच कँडी, लीलावती व बॉम्बे हॉस्पिटलसह अनेक प्रसिध्द खासगी रुग्णालयांचा यामध्ये सावेश आहे.

सर्वाधिक बील खुद्द आरोग्यंमत्री राजेश टोपे यांचं 34 लाखांहून अधिक आहे. दोन मंत्र्यांनी दोन वर्षांत चार वेळच्या उपचारांची बिले दिली, तर ४ मंत्र्यांनी दोन वेळा खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. यातील बहुतांश उपचार कोरोना, कोरोना पश्चातील गुंतागुंत, हृदय शस्त्रक्रिया व नेत्र शस्त्रक्रिया यासाठी घेतल्याचे समजते. राजेश टोपे यांच्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांची 17 लाख 63 हजार रुपयांचं बील आहे.

हसन मुश्रिफ, अब्दुल सत्तार, जितेंद्र आव्हाड या मंत्र्यांची दहा लाखांपुढे बिलं आहेत. तर छगन भुजबळ, सुनील केदार, जयंत पाटील, सुभाष देसाई व अनिल परब यांची पाच ते दहा लाखांपर्यंतची बिले सरकारी तिजोरीतून देण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे अशोक चव्हाण, नवाब मलिक, संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे, दत्तात्रय भरणे, विजय वडेट्टीवर, के. सी. पाडवी यांचाही सरकारी तिजोरीतून खासगी रुग्णायांची बिले देणाऱ्या मंत्र्यांमध्ये समावेश आहे.

खासगीत उपचार घेणारे मंत्री -

1. राजेश टोपे, सार्वजनिक आरोग्य मंत्री - 34 लाख 40 हजार 930

2. डॉ. नितीन राऊत, ऊर्जामंत्री - 17 लाख 63 हजार 879

3. हसन मुश्रीफ, ग्रामविकासमंत्री - 14 लाख 56 हजार 604

4. अब्दुल सत्तार, महसूल राज्यमंत्री - 12 लाख 56 हजार 748

5. जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माणमंत्री - 11 लाख 76 हजार 278

6. छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री - 9 लाख 3 हजार 401

7. सुनील केदार, पशुसंवर्धनमंत्री - 8 लाख 71 हजार 890

8. जयंत पाटील, जलसंपदामंत्री - 7 लाख 30 हजार 513

9. सुभाष देसाई, उद्योगमंत्री - 6 लाख 97 हजार 293

10. अनिल परब, परिवहन मंत्री - 6 लाख 79 हजार 606

11. अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री - 2 लाख 28 हजार 184

12. संजय बनसोडे, पर्यावरण राज्यमंत्री - 2 लाख 20 हजार 661

13. विजय वडेट्टीवार, इतर मागासवर्ग मंत्री - 2 लाख 4 हजार 45

14. के. सी. पाडवी, आदिवासी विकास मंत्री - 1 लाख 25 हजार 284

15. दत्तात्रेय भरणे, राज्यमंत्री - 1 लाख 5 हजार 886

16. प्राजक्त तनपुरे, उर्जा राज्यमंत्री - 38 हजार 998

17. नवाब मलिक, अल्पसंख्याक मंत्री - 26 हजार 520

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT