अमरावती : जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा येथे दंगल उसळण्यानंतर माजी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) या घटनेमागच्या मास्टरमाइंड आहेत, असा आरोप केला होता. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. आता ठाकूर यांच्या मुलीनं या वादात उडी घेतली आहे. तिनं बोंडेे यांचे कान टोचले आहेत. अमरावतीच्या तरूणांना बिघडवू नका, असं आवाहन करताना या भाचीनं कुणी आपल्या वाटेला आलं तर सोडणार नाही, असं सूचक इशाराही दिला आहे.
अनिल बोंडे यांना मामा म्हणणारी ही भाची आहे आकांक्षा ठाकूर. मागील अनेक दिवसांपासून बोंडे यांच्याकडून ठाकूर यांना सातत्याने लक्ष्य केलं जात आहे. अचलपूर येथे रविवारी रात्री दुल्ला प्रवेशद्वारावर झेंडा लावल्यावरून वाद झाला. त्यानंतर तेथे दंगल पेटली. त्यावरून बोंडे यांनी ठाकूर यांच्यावर पुन्हा निशाणा साधत त्यानांच जबाबदार धरलं. त्यावरून आकांक्षा यानी फेसबूकवर पोस्ट टाकत बोंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
बोंडे यांच्या या आरोपांनंतर आकांक्षा ठाकूर (Akanksha Thakur) हिने आईची बाजू घेतली आहे. 'मला भारताला सुपरपॉवर बनताना बघायचे आहे. ज्या भारतात कुणी बेरोजगार राहणार नाही. जाती-धर्माच्या नावावर अत्याचार होणार नाहीत. भारताचा जीडीपी वाढेल. कालपासून अमरावती जे सुरू आहे, त्यावर मला अनिल बोंडे मामांना काही सांगायचे आहे. होय, मी मामा बोलतेय. हीच भारताची संस्कृती आहे,' अशी सुरूवात करणारा व्हिडीओ तिनं शेअर केला आहे.
आकांक्षा पुढे म्हणते की, माझ्या आईने मला हेच शिकवले आहे. तुमची मुले परदेशात जाऊन ते देश सुपरपॉवर करण्यात बिझी आहेत. पण आम्ही इथे भारतात, महाराष्ट्रात, अमरावतीत राहतोय. आम्हाला इथे राहून या देशांचं नंदनवन करायचं आहे. हे नंदनवन उजडवू नका. अमरावती एक औद्योगिक जिल्हा आहे. अनेकांचे रोजगार या जिल्ह्यात आहेत. अनेकांची स्वप्ने या जिल्हात या मातीत रूजलीयत. त्यावर तुम्हाला रक्ताचा सडा हवाय का? कृपया हे करू नका. तुमचं राजकारण होईल, तुम्हाला कोणी तरी ह्रदयसम्राट वगैरे म्हणेल पण अमरावती उद्ध्वस्त होऊन जाईल, अशा शब्दांत आकांक्षा हिने बोंडे यांना सुनावलं आहे.
तुम्ही आमच्यासारख्या तरूणांना का बिघडवत आहात. अमरावती एक इंडस्ट्रियल सिटी आहे. इथे सगळे एकत्र राहतात. तुम्ही काल अमरावतीच्या पालकमंत्र्यांविषयी बोलला. मी लहानपणापासून आईचे संभाषण बघितले आहे. माझ्या आईने मला सेवा करायला शिकवले आहे. पण आईने मला एक शिकवणही दिली आहे. आपण कुणाच्या वाटेला जायचे नाही, पण कुणी आपल्या वाटेला आलं तर त्याला सोडायचे नाही, असा दमही आकांक्षाने भरला.
दरम्यान, हिंसाचाराच्या घटनेनंतर पोलिस प्रशासनाने अचलपूर आणि परतवाड्यामध्ये संचारबंदी लागू केली. बुधवारी तिसऱ्या दिवशीही संचारबंदी लागू होती. पण नागरिकांना सकाळी ३ तास आणि सायंकाळी ३ तास जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी शिथिलता देण्यात आली होती. घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. गुरूवारपासून संचारबंदीमध्ये आणखी शिथिलता वाढविण्यात येणार असल्याची शक्यता पोलिस प्रशासनाने वर्तविली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.