Ambulance Scam News Sarkarnama
मुंबई

Ambulance Scam: तानाजी सावंतांच्या आरोग्य विभागाचा आणखी एक अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा!

Tanaji Sawant: 39 अॅम्ब्युलन्ससाठी 26 कोटी 64 लाखांच्या खर्चास मान्यता

सरकारनामा ब्यूरो

संजय परब

Mumbai : कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत यांचे सार्वजनिक आरोग्य खाते पुन्हा एकदा घोटाळ्यात अडकल्याचे समोर आले आहे. या खात्याचा 8 हजार कोटींचा अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा झाल्याचा आरोप ताजा असतानाच आरोग्य विभागाने पुन्हा एकदा अॅडव्हान्स लाईफ सपोर्टींग (एएलएस) अ‍ॅम्ब्युलन्स खरेदीच्या माध्यमातून जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली आहे. अंदाजे 30 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत मिळणारी एएलएस अ‍ॅम्ब्युलन्स 68 लाख रुपयांना विकत घेतली जाणार आहे. म्हणजेच एका अ‍ॅम्ब्युलन्समागे 18 लाख रुपये अधिक खर्च केला जाणार आहे. एकूण 39 अ‍ॅम्ब्युलन्ससाठी 26 कोटी 64 लाखांच्या खर्चास मान्यता दिल्याचे 29 जानेवारी रोजी निघालेल्या शासन निर्णय (जीआर) स्पष्ट झाले आहे.

“सरकारनामा”ने प्रथम तानाजी सावंत यांच्या खात्यात “आठ हजार कोटींचा “अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा” झाल्याची बातमी प्रथम प्रसिद्ध केली होती. या बातमीने राज्यात एकच खळबळ उडाली होती. यासंदर्भातील एकूणच टेंडर प्रक्रिया संशयास्पद असल्याने सावंत अडचणीत आले आहेत. आता हे कमी म्हणून की काय आता आणखी एक घोटाळा सावंत यांच्या खात्यात झाल्याने हे खाते म्हणजे भ्रष्टाचाराचा आगर झाल्याचे मंत्रालयात आता उघडपणे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गरीब व गरजू रुग्णांना सरकारी अ‍ॅम्ब्युलन्स ही आधार ठरते. रुग्णालयात वेळेवर पोहोचून उपचार मिळाले तर गंभीर रुग्णाचा जीव वाचतो. पण या गरजेचा गैरफायदा तानाजी सावंत यांचे खाते घेत आहे. काही दिवसांपूर्वी अ‍ॅम्ब्युलन्स खरेदीचे चार हजार कोटींचे टेंडर सरकारने आठ हजार कोटींपर्यंत फुगवले होते. आता एएलएस अ‍ॅम्ब्युलन्स खरेदीमधून भ्रष्टाचार केला जात आहे.

राज्यातील आठ अतिजोखमीच्या जिल्ह्यांसाठी ३९ एएलएल अ‍ॅम्ब्युलन्स खरेदी केल्या जाणार आहेत. त्यांचा वापर विशेषतः रस्ते अपघातातील जखमींसाठी केला जाणार आहे. रस्ता सुरक्षा निधी नियंत्रण समितीच्या शिफारशीनुसार या अ‍ॅम्ब्युलन्स खरेदी केल्या जात असून खरेदी प्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागाने केली आहे. या खर्चाला मान्यता देण्यात आल्याचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला. सुरूवातीला या अ‍ॅम्ब्युलन्ससाठी 14 कोटी, 82 लाख, 86 हजार 190 रुपये खर्च केला जाणार होता. परंतु अत्याधुनिक उपकरणांच्या नावावर त्या खर्चात आणखी 26 कोटींपर्यंत वाढ करण्यात आली. अद्ययावत अ‍ॅम्ब्युलन्स गरजेच्या असल्या तरी दर वाढवून त्यातून कमिशन काढण्यामागे नक्की कोणाचा हात आहे, अशी चर्चा आरोग्य विभागातच सुरू आहे.

असा होणार खर्च

  • प्रति एएलएस अॅम्ब्युलन्सवरील खर्च - 68 लाख 31 हजार 910 रुपये

  • एकूण 39 एसएलएस अॅम्ब्युलन्ससाठीचा खर्च - 26 कोटी 64 लाख 44 हजार 490 रुपये

  • एएलएस अॅम्ब्युलन्समध्ये काय असते

  • 1 ऑटो लोडर- कोलॅपसिबल स्ट्रेचर

  • 1 स्कूप स्ट्रेचर

  • पट्ट्या आणि हेड ब्लॉक्ससह स्पाइन बोर्ड

  • 1 व्हील चेअर

  • 2 पोर्टेबल ऑक्सीजन सिलिंडर

  • 1नेब्यूलायझर

  • 1 इलेक्ट्रिक सक्शन पंप

  • 1मल्टीपॅरा मॉनिटर

  • बायफॅसिक डीफीब्रीलेटर कम कार्डिएक मॉनिटर वुईथ रेकॉर्डर

  • ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर

  • पल्स ऑक्सिमीटर

  • सक्शन पंप (मॅन्युअल आणि इलेक्ट्रॉनिक)

  • सिरिंज इन्फ्यूजन पंप

  • प्रत्येक एएलएस अॅम्ब्युलन्सचा सध्याचा बाजारभाव

  • फोर्स कंपनी - 27 लाख रुपये

  • टाटा विंगर - 28 लाख 50 हजार रुपये

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT