Hitendra Thakur Sarkarnama
मुंबई

मी घोडा नसून आमदार; मला विकत घेणारा पक्ष बघायचाय : हितेंद्र ठाकूर भडकले!

खासदार संजय राऊत यांच्या आरोपाला हितेंद्र ठाकूर यांनी दिले उत्तर

संदीप पंडित

विरार : राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya sabha Election) शिवसेनेचे (shivsena) संजय पवार यांचा प्रभाव झाल्यानंतर अपक्षांनी दगा दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. त्यामुळे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) पाठिंबा दिलेल्या अपक्षांनी आता आपले मौन सोडण्यास सुरुवात केली आहे. बहुजन विकास आघाडीचे सर्वोसर्वा हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) हे तर चांगलेच भडकले. ‘मी आमदार आहे, घोडा नाही. मी विकण्यासाठी नाही आणि मला विकत घेणारा पक्ष मला बघायचा आहे,’ अशा शब्दांत त्यांनी आव्हान दिले आहे. (Hitendra Thakur reply to MP Sanjay Raut's allegation)

राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी बहुजन विकास आघाडीच्या तीन मतांचा पाठिंबा मिळावा, यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा, यासाठी ठाकूरांना फोन आला होता. पण, ठाकूर यांनी निवडणुकीत मतदान केल्यानंतरही आपण कोणाला मत दिले, याचा थांगपत्ता लागू दिला नव्हता. मतमोजणीनंतर शिवसेनेचा उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यावर संजय राऊत यांनी त्याचे खापर अपक्षांवर फोडले.

संजय राऊतन यांनी शिवसेनेला मतदान न केलेल्या अपक्षांची नावेही जाहीर केली. यामध्ये बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील यांची नावे घेतल्यावर हितेंद्र ठाकूर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, आम्ही कोणाला मतदान केले, हे इतरांना कसे समजले. आमचे मत गुप्त होते. आम्ही अपक्ष असल्याने इतर राजकीय पक्षांप्रमाणे इतरांना मत दाखवले नव्हते. मग, आम्ही महाविकास आघाडीला मतदान केले नाही, हे कशावरून असा प्रश्न त्यांनी केला आहे.

मी निवडणुकीपूर्वीच सांगितले होते की, मी विकण्यासाठी नाही आणि मला विकत घेईल, असा पक्षही नाही. आमदारकीच्या ३५ वर्षांच्या काळात माझ्यावर ना भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेतील कोणी असा आरोप केला. त्यामुळे परत सांगतो मी आमदार आहे, घोडा नाही. या निवडणुकीत आम्ही सर्व विजयी उमेदवारांना मतदान केले आहे. आम्हाला निवडणुकीत जेवढे उमेदवार असतील, तेवढी पसंतीची मते देता येतात. तशी आम्ही दिली आहेत, त्यामुळे उगाचच पराभवाचे खापर कोणावर तरी फोडायचे हे काही बरोबर नाही, असेही आमदार ठाकूर यांनी राऊतांना सुनावले.

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर विधान परिषदेची निवडणूक होत असल्याने, त्यावेळीही महाविकास आघाडीला अपक्षांची मते लागणार आहेत, त्यामुळे संजय राऊत यांच्या आरोपानंतर हे अपक्ष काय निर्णय घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT