Kirit Somaiya-Dilip walse Patil
Kirit Somaiya-Dilip walse Patil Sarkarnama
मुंबई

सोमय्यांनी दिलेल्या आव्हानाला वळसे पाटलांनी दिलं असं उत्तर...

सरकारनामा ब्युरो

पुणे : शिवसेनेचे (Shiv Sena) नेते व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचा साई रिसॅार्ट तोडण्यासाठी हातोडा घेऊन निघालेले भाजपचे (Bjp) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यावरून सोमय्या यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्यावर निशाणा साधला होता. हिंमत असेल तर माझ्यावर कारवाई करून दाखवावी, असं ओपन चॅलेंज सोमय्या यांनी दिलं होतं. त्याला वळसे पाटलांनी रविवारी उत्तर दिलं.

किरीट सोमय्या यांनी शनिवारी दापोली पोलीस स्टेशनच्या पायऱ्यांवरच तळ ठोकला होता. यावेळी मोठा हायव्होल्टेज ड्रामा रंगला होता. याबाबत बोलताना वळसे पाटील म्हणाले होते की, मला या विषयाला फारसे महत्व द्यायचे नाही. सोमय्या कुठे गेलेत याची माहिती मी ठेवत नाही. कायदा-सुव्यवस्था बिघडणार असेल तर पोलीस नियमानुसार कारवाई करतील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर सोमय्या यांनी पोलीस स्टेशनबाहेरूनच प्रत्युत्तर दिलं.

गृहमंत्र्यांमध्ये दम आहे का? उगाच धमक्या देऊ नका, कारवाई करूनच दाखवा, असं आव्हान सोमय्या यांनी दिलं होतं. त्यावर माध्यमांशी बोलताना वळसे पाटील यांनी पोलिसांकडे बोटे दाखवलं. ते म्हणाले, गृहमंत्री कुणावर गुन्हे दाखल करत नसतात ते पोलीसांचे काम आहे आणि पोलीस काम करत आहेत, असं सांगत वळसे पाटील यांनी पोलिसांनी शनिवारी केलेल्या कारवाईचे समर्थन केले.

काय आहे प्रकरण?

किरीट सोमय्या शनिवारी दुपारी दापोलीत दाखल झाले होते. त्यांच्या सोबत माजी खासदार भाजप नेते निलेश राणेही (Nilesh Rane) होते. दापोली पोलिस स्टेशनच्या बाहेर भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. त्यामुळे दापोलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर सोमय्या यांनी साई रिसॅार्टकडे जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे रत्नागिरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.

सोमय्या यांनी साई रिसॅार्टवर जाऊ नये यासाठी पोलीस त्यांना विनंती केली होती. मात्र, रिसॅार्टवर जाण्यावर सोमय्या ठाम होते. त्यामुळे सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दापोलीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना सोमय्या म्हणाले होते की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुमच्यात हिंमत असेल तर अनिल परब यांचा रिसॅार्ट वाचवून दाखवा. मी रिसॅार्ट तोडून दाखवणार, असे आव्हान त्यांनी दिले होते. मला दापोलीच्या नागरिकांचे कौतुक करायचे आहे. येथे दिवाळीत आल्यावर दापोलीकरांना मी वचन दिले होते की अनिल परब यांची माफियागिरी संपवल्याशिवाय राहणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT