मुंबई : पवार साहेबांचे नाव घेतल्याशिवाय हेडलाईन बनणार नाही, म्हणून लोक आपल्या भाषणांमध्ये हमखास त्यांचे नाव घेतात, असा टोला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लगावला.
जितेंद्र आव्हाड मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यात बोलताना महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या (NCP) जन्मानंतर जातीय वाद वाढला, असा आरोप केला होता. त्या आरोपावर आव्हाड बोलत होते. ते यावेळी म्हणाले, शरद पवार यांच्यामुळे जातीपातीचे राजकारण वाढले, असे म्हटले जात आहे. मी स्वत: सुद्धा मागासवर्गीय समाजातून आलो. आज मला साहेबांसोबत काम करून ३५ वर्षे झाली. राजकीय पार्श्वभूमी नसून सुद्धा मी आज या राज्याचा गृहनिर्माण मंत्री आहे.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) , सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आम्ही सारे मागासवर्गीय समाजातून येतो. मंडल आयोग आणताना या समाजातल्या शोषित-वंचित वर्गाला मुख्य प्रवाहात आणायचे, हाच साहेबांचा विचार होता. पवार साहेबांमुळेच महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले, असे आव्हाड यांनी सांगितले. त्यामुळे पवार साहेबांचे नाव घेतल्याशिवाय बातम्यांमध्ये हेडलाईन होत नाही, म्हणून लोक हमखास आपल्या भाषणांमध्ये त्यांचे नाव घेतात, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरे यांचा समाचार घेतला.
तसेच महाराष्ट्र पेटेल असे काही वक्तव्य कोणीही करू नये. महाराष्ट्रात सध्या सगळे समाज एकत्र वावरतात, एकत्र काम करतात. महाराष्ट्र शांत आहे. कुठेही क्लेश नाही. द्वेष दिसत नाही, असेही आव्हाड म्हणाले. कोरोनाच्या संक्रमणाची दोन वर्षे संपल्यानंतर लोकांना काम लागले. त्यांच्या खिशात पैसे नाहीत. गॅस महाग झाला. पेट्रोल-डिझेल महागले. भाज्या, केरोसिन महागले, खाण्यापिण्याच्या वस्तूपासून सर्वच महाग झाले, याबाबत काही बोलत नाहीत. मात्र, जे गरजेचे नाही ते मुद्दे बनवले जात असून मुख्य विषयापासून दुसरीकडे नेण्याचे काम सुरु आहे. महागाईबद्दल बोला ना. ही महागाई गरीबांना किती खाते आहे, याबद्दल बोला. श्रीराम जरूर म्हणा परंतु लोकांना 'राम नाम सत्य है' बोलायला लावू नका, असा इशाराही आव्हाड यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.