Mumbai News, 09 Nov : "कोणती भाषा कधी वापरायची, काय लिहायचं, काय बोलायचं? याचे मला धडे घेण्याची गरज नाही, ते राज ठाकरे (Raj Thackeray) असतील तर मी राऊत आहे", अशा शब्दात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
'संपूर्ण महाराष्ट्राची भाषा घाणेरडी करणारा भिकार संपादक इथं राहतो. त्याला वाटतं तोंड त्यालाच आहे. अशी टीका राज ठाकरे यांनी भांडुपमधील सभेत बोलताना संजय राऊत यांच्यावर केली होती. राज ठाकरेंच्या याच टीकला आता राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
माध्यमांशी बोलताना राऊतांनी (Sanjay Raut) या टीकेला उत्तर दिलं. ते म्हणाले, राज ठाकरे बोलत आहेत ना बोलूद्या त्यांना. भाजपाच्या नादाला लागलेला माणूस दुसरं काय बोलू शकतो? जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी भाषा हे सुद्धा एक हत्यार आहे. ज्याला जी भाषा समजते, त्या भाषेचा वापर करावा असं आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलं आहे."
भाषेची शुद्धता, शुद्ध तुपातली भाषा कोणासाठी महाराष्ट्राच्या शत्रूसाठी वापरायची? आम्ही ही चाटूगिरी, चमचेगिरी करणारे लोक नाही. राज ठाकरे (Raj Thackeray) काय बोलले, त्यात मला जायचं नाही. फडणवीसांची स्क्रिप्ट असेल त्यांना बोलावं लागतं नाहीतर ईडीची तलवार आहेच, असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना डिवचलं.
दरम्यान, यावेळी ते राज ठाकरे असतील तर मी बाळासाहेबांनी घडवलेला राऊत आहे, अशा शब्दात राऊत कडाडले. ते म्हणाले, "आम्ही अत्यंत सभ्य, सुस्कृंत माणसं आहोत. आम्ही एका परंपरेमध्ये राजकारण केलं आहे. माझं बरचसं आयुष्य बाळासाहेबांबरोबर गेलं आहे. हे राज ठाकरेंना देखील माहिती आहे.
कोणती भाषा कधी वापरायची, काय लिहायचं, काय बोलायचं याचे धडे मला घेण्याची गरज नाही. ते राज ठाकरे असतील तर मी राऊत आहे. बाळसाहेबांनी घडवलेला राऊत आहे." शिवाय आज महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात गुंडांच राज्य सुरु आहे, त्यावर राज ठाकरेंनी बोलावं, असा सल्लादेखील राऊतांनी राज ठाकरेंना दिला.
दरम्यान, अमित शाह यांनी पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील याबाबतचे संकेत दिले आहेत.यावर बोलताना राऊत म्हणाले, "हा आमचा प्रश्न नाही. मी हे तीन महिन्यांपासून सांगत आहे कोणत्याही परिस्थितीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या राज्याचे मुख्यमंत्री होणार नाही.
शिवाय एकनाथ शिंदे यांचं अवतार कार्य भाजप संपवणार आहे आणि ते संपवायला सुरुवात झाली आहे. याचा अर्थ फडणवीस होतील का तर तेही नाही कारण मुख्यमंत्री तर महाविकास आघाडीचा होईल", असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.