Ashish Shelar Latest News
Ashish Shelar Latest News Sarkarnama
मुंबई

माझ्या तक्रारीची दखल न घेतल्यास...आशिष शेलारांचा मुंबई पालिका आयुक्तांना इशारा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) ४८० शाळांमध्ये सुरू असलेल्या व्हर्च्युअल क्लासरुम चालवण्याबाबतची निविदेमध्ये पादर्शकता दिसून येत नाही. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करीत या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी भाजप (BJP) नेते आणि मुंबई अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांच्याकडे केली आहे. (Ashish Shelar Latest News)

शेलार यांनी याबाबत पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात या प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचाराची सविस्तर माहिती दिली आहे. शेलार आपल्या पत्रात म्हणाले की, सदर निविदेचा अभ्यास केल्यानंतर असे निदर्शनास येते की, या निविदेमध्ये घालण्यात आलेल्या अटी-शर्ती या एका विशिष्ट कंत्राटदाराला ही निविदा मिळावी म्हणून घालण्यात आल्या आहेत. ज्या कंपनीला हे काम देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, सदर कंपनीने दिलेले अनुभवाचे प्रमाणपत्र बोगस व खोटे असल्याचे दिसून येते आहे. त्याची महापालिकेच्या संबंधितांनी पडताळणी न करताच सदर कंपनीला काम प्रस्तावित केल्याचे दिसून येते आहे. हे काम तांत्रिक असल्याने कामांचे तांत्रिक गुणांकन होणे अपेक्षित होते, मात्र तसे झालेले दिसून येत नाही. हे काम तांत्रिक व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरसोबत जोडलेले असल्यामुळे त्या विषयातील तज्ञ व तांत्रिक दृष्टया सक्षम असलेल्या कंपनीला हे काम मिळणे अपेक्षित होते. मात्र ज्या कंपनीला हे काम प्रस्तावित करण्यात आले आहे ती कंपनी तांत्रिकदृष्टया अद्ययावत व सक्षम नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

पुढे शेलार म्हणाले, ज्या कंपनीला हे काम प्रस्तावित करण्यात आले. त्या कंपनीकडे सदर कामाचा कोणत्याही स्वरुपातील अनुभव असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे एकुणच कामाचा खेळखंडोबा झाल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावरही परिणाम होऊ शकतो. सदर निविदेबाबत आयटी अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी, तांत्रिक सल्लागार आणि सदर कंपनीचे अधिकारी यांच्यात वारवांर संभाषण झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अशा प्रकारचे संवाद का झाले? त्यांच्यात झालेले हे संवाद थेट भ्रष्ट्राचाराला खतपाणी घालणारे आहेत. त्याबाबतच्या तक्रारी आपल्याला तसेच लाचलुचपत विभागकडे ही करण्यात आल्याचे मला समजले असून ही बाब अत्यंत गंभीर आहे. याचबरोबर तांत्रिक सल्लागारांच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये शिक्षण विभागातील अधिकारी, आयटी विभागातील अधिकारी आणि सदर कंपनी यांच्यामध्ये संगनमत झाले असेही दिसते आहे. असे ते म्हणाले.

त्यामुळे तातडीने ही निविदा प्रक्रिया रद्द करुन या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, तसेच फेर निविदा काढण्यात यावी, अशी विनंती शेलार यांनी दिलेल्या पत्रात केली आहे. तसेचहा विषय महापालिका शाळांमधील गरीब विद्यार्थ्यांशी संबंधित असल्याने जर माझ्या या तक्रारीची दखल न घेतल्यास माझ्याकडे आलेली भ्रष्टाचाराची माहिती मला उघड करावी लागेल. त्यामुळे आपण या विषयाची गांभिर्याने दखल घ्यावी ही विनंतीवजा इशाराही शेलार यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT