Mumbai News, 27 June : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून (ता.27 जून) सुरुवात होत आहे. यंदाचं हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. कारण विरोधकांनी राज्यातील विविध मुद्द्यांवरुन महायुती सरकारची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे.
यामध्ये, शेतकरी कर्जमाफी, मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद, पुणे ड्रग्ज प्रकरण, परीक्षांतील घोळ, अशा विविध मुद्द्यांचा समावेश आहे. तर महायुती सरकार देखील विरोधकांचा डाव उलटवून टाकण्याच्या तयारीत आहे.
अधिवेशनात विरोधकांना सर्व प्रश्नांची उत्तर देण्याची तयारी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी दाखवली आहे. शिवाय महायुती सरकारच्या कारकीर्दीतील हे शेवटचे अधिवेशन असल्यामुळे सरकारकडून अनेक महत्त्वाचे आणि लोकप्रिय निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकार अधिवेशनात जे काही निर्णय घेईल त्याचा परिणाम येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये दिसून येणार आहे.
अधिवेशनात महिला मतदारांना खुश करण्यासाठी राज्य सरकारकडून मुलींचे पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याची मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. हा निर्णय मुलींसाठी मोठा दिलास देणारा ठरणार आहे. शिवाय सरकारने मोफत शिक्षणाची घोषणा केल्यास विरोधकांच्या इतर मुद्द्यांकडे लोकांचं दुर्लक्ष होऊ शकतं. त्यामुळे सरकार ही घोषणा करण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.
मागील काही दिवसांपासून राज्य सरकार गोरगरीब, मध्यमवर्गीय महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करणारी एक योजना आखत असल्याची माहिती आहे. मध्य प्रदेश सरकार 'लाडली बहना' योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर प्रत्येक महिन्याला 1250 रुपये जमा करते. तशीच एक योजना महाराष्ट्र सरकार सुरु करणार असल्याची माहिती आहे.
शिवाय राज्य सरकार मध्य प्रदेश सरकारच्या आर्थिक मदतीपेक्षा अधिकची रक्कम म्हणजे जवळपास 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता आहे. शिवराज सिंह चौहान यांची लाडली बहन योजना मध्य प्रदेशात चांगलीच लोकप्रिय ठरली होती.
याचा फायदा त्यांना लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीपूर्वी अशी योजना सुरु केल्यास त्याचा महायुती सरकारला फायदा होऊ शकतो. त्यामुळे सरकार अशा योजनेची अमंलबजावणी करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील मुलींना मोफत शिक्षण देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, त्याबाबतची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. याच मुद्द्यावरुन मुलींच्या मोफत शिक्षणाच्या घोषणेची आठवण व्हावी म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील यांना आम्ही बदाम पाठवणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी केलं होतं. तर यावर, मी कोल्हापूरचा असून मला बदामाची गरज नाही, असं प्रत्युत्तर दिलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.