Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : मुंबईकरांसाठी खुशखबर! पाच प्रमुख टोल नाके बंद; CM शिंदेंचा मोठा निर्णय

Pradeep Pendhare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईबाबत मास्टर स्ट्रोक खेळला आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाच प्रमुख टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला.

या निर्णयाची अंमलबजावणी आज मध्यरात्री बारा वाजल्यापासून सुरू होईल. आनंदनगर टोलनाका, दहिसर टोलनाका, मॉडेला टोलनाका, वाशी टोलनाका, ऐरोली टोलनाका या पाच टोलनाक्यांचा समावेश असेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळात बैठक झाली. या बैठकीतील पहिला निर्णय मुंबईच्या अनुषंगाने घेण्यात आला. मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफीची अंमलबजावणी आज मध्यरात्री बारा वाजल्यापासून होणार आहे.

मुंबईत 'एमएसआरडीसी'ने 55 उड्डाणपुलांची उभारणी केली. या पुलांचा खर्च वसूल करण्यासाठी मुंबईच्या प्रवेशद्वारांवर सर्वप्रथम टोलनाके उभारण्यात आले होते. आता पुल उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे टोलनाके उभारण्यासाठी सन 1999 मध्ये निविदा काढण्यात आली होती. 2002 मध्ये पाचही टोलनाके कार्यान्वित करण्यात आले. मुंबईमध्ये प्रवेशद्वारावर टोल वसुली सुरू केली होती.

महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबईमधले टोल माफी करण्यात यावी, यासाठी मनसेकडून (MNS) वारंवार आंदोलन करण्यात आली. अनेक वेळा राज ठाकरे यांनी आताच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे देखील यासंदर्भात भेट घेतली होती. पुलांच्या खर्च वसूल झाल्यानं टोल नाके बंद करावेत, अशी मागणी लावून धरली होती.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला ठाणे आहे. ठाणे जिल्ह्यातून मुंबईत नोकरीनिमित्ताने किंवा व्यवसायानिमित्ताने येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. टोलमुळे त्यांना आर्थिक झळ बसत होती, या निर्णयामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT